Maruti पुन्हा ठरली नंबर 1 कंपनी; Hyundai ला बसला मोठा झटका; Tata ची बल्ले-बल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:37 PM2022-06-01T23:37:20+5:302022-06-01T23:46:10+5:30

महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे

मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स सारख्या दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीत मे महिन्यात जबरदस्त वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरची कमतरता असतानाही, कंपन्यांनी सर्वच सग्मेंटच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

टाटाने ह्युंदाईला टाकलं मागे - भारतात मे, 2022 मध्ये गाड्या विकण्याच्या बाबतीत टाटा मोटर्सची विक्री ह्युंदाईच्या तुलनेत अधिक होती. तर देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाची (एमएसआय) विक्री मे महिन्यात वाढली असून मारुतीने तब्बल 134222 गाड्यांची विक्री केली आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे, मे 2021 मध्ये, कंपनी केवळ 35,293 वाहनेच विकू शकली. तसेच कंपनीने म्हटल्यानुसार, या वर्षी मे महिन्यात, स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर सारख्या मॉडेलसह कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये 67,947 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी या काळात हा आकडा 20,343 एवढा होता.

म्हणून ह्युंदाई पडली मागे - भारतीय बाजारात वाहन विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. मे महिन्यात कंपनीची विक्री वाढून 43,341 वर पोहोचली. ही कंपनीची आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक विक्री आहे. याशिवाय ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री मे महिन्यात वार्षिक आधारावर वाढून 42,293 वर पोहोचली आहे.

ह्युंदाई मोटरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या चेन्नईतील दोन्ही प्लांटमधील मेन्टनन्समुळे उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे गेल्या महिन्यात १६ ते २१ मे या सहा दिवसांत कोणतेही उत्पादन होऊ शकले नाही. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे मे महिन्यात वाहनांची कमतरता होती. यामुळे याचा विक्रीच्या आकड्यांवरही परिणाम झाला.

महिंद्रासाठीही चांगला ठरला मे महिना - महिंद्र अँड महिंद्राने मे महिन्यात भारतीय बाजारात 26,904 वाहनांची विक्री केली. महिंद्रा अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह विभागाचे चेअरमन विजय नाकरा म्हणाले, “आम्ही मे महिन्यात 26,632 एसयूव्ही विकल्या. XUV700 आणि थार सह आमच्या सर्व ब्रँड्सचे चांगले प्रदर्शन झाले आहे.''

किआच्या विक्रीतही वाढ - मे महिन्यात किआ इंडियाची विक्री वार्षिक आधारावर 69 टक्क्यांनी वाढून 18,718 वाहनांवर पोहोचली. मे 2021 मध्ये, कंपनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत केवळ 11,050 वाहनेच विकू शकली होती.

टोयोटाच्या विक्रीतही वाढ - टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM)च्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने मे महिन्यात 10,216 वाहनांची विक्री केली. कंपनीने गेल्या वर्षी मे महिन्यात केवळ 707 वाहनांची विक्री केली होती.

होंडा, स्कोडा, एमजी - होंडा कार्स इंडियाची देशांतर्गत विक्री गेल्या महिन्यात वर्षिक आधारावर वाढून 8,188 वाहनांवर पोहोचली. जी मे 2021 मध्ये 2,032 होती. याशिवाय मे महिन्यात स्कोडा इंडियाने 4,604 वाहने आणि MG मोटर इंडियाने 4,008 वाहनांची विक्री केली.

बजाज ऑटो, टीवीएस मोटर - दुचाकी सेग्मेंटमध्ये मे महिन्यात बजाज ऑटोची भारतातील विक्री 1,12,308 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 60,830 दुचाकींची विक्री केली होती.

TVS मोटर कंपनीची दुचाकी विक्रीही गेल्या महिन्यातत वाढून 1,91,482 वर पोहोचली. जी मे 2021 मध्ये 52,084 एवढी होती.