१५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं जुन्या Royal Enfield पासून तयार केली Electric Bike; १००किमी रेंज, खर्चही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:49 AM2021-09-20T10:49:38+5:302021-09-20T10:56:50+5:30

सध्या Petrol, Diesel च्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण Electric Bike कडे वळत आहेत. अशातच १५ वर्षांच्या मुलानं तयार केली जुन्या रॉयल एन्फिल्डची इलेक्ट्रीक बाईक.

सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थित लोक आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. दरम्यान, अनेक दिगग्ज कंपन्यांनीही आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. दिल्लीतील एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांनं स्क्रॅप पार्ट्सचा वापर करून इलेक्ट्रीक रॉयल एन्फिल्ड (Electric Royal Enfield) तयार केली आहे. ही बाईक तयार करण्यासाठी केवळ ४५ हजार रूपयांचा खर्च आल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील सुभाष नगर येथे राहणाऱ्या ९ चा विद्यार्थी राजन यानं ही कमाल केली आहे. ही इलेक्ट्रीक बाईक तयार करण्यासाठी त्यानं स्क्रॅपसोबत जुन्या बाईकचा वापर केला आहे. या बाईकचे पार्ट्स मिळवण्यात ३ महिन्यांचा कालावधी लागल्याचंही राजन यानं सांगितलं. यानंतर केवळ ३ दिवसांमध्ये पार्ट्स असेंबल करून इलेक्ट्रीक बाईक तयार केल्याचंही तो म्हणाला.

असं पहिल्यांदाच झालं नाही जेव्हा राजन यानं इलेक्ट्रीक बाईक तयार केली आहे. यापूर्वीही त्यानं इलेक्ट्रीक सायकल तयार केली होती. परंतु त्यात त्यानं स्पीड कंट्रोल मेकॅनिज्मचा वापर केला नव्हता. यामुळे त्याचा एक अपघात झाला होता आणि त्यात त्याला दुखापतही झाली होती.

या घटनेनंततर लॉकडाऊन दरम्यान राजन यानं आपल्या घराच्या जवळ असलेल्या दुकातील मेकॅनिकसह काम पाहिलं. त्यानंतर त्यानं इलेक्ट्रीक वाहनाशी निगडीत सर्व माहिती मिळवली आणि इलेक्ट्रीक बाईक तयार केली. राजन हा लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी होता आणि त्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आवड होती. ही बाईक तयार करतानाही शाळेतून बाईक रिसायकल करण्याचा प्रोजेक्ट मिळाला असल्याचं त्यानं आम्हाला खोटं सांगितलं होतं, असं त्याचे वडील दशरथ शर्मा म्हणाले.

याचं काम करताना वेल्डिंग दरम्यान त्याला अनेकदा दुखापत झाली. परंतु त्यानं माघार घेतली नाही आणि आपलं काम सुरू ठेवलं. माझ्याकडे कामामुळे त्याची मदत करण्याचा वेळ नव्हता. परंतु त्यानं एकट्यानं ही बाईक तयार केल्याचं ते म्हणाले.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार त्यानं ही बाईक तयार करण्यासाठी एका जुन्या रॉयल एन्फिल्डचा वापर केला. ही राजन यानं मायापुरी येथील स्क्रॅप मार्केटमधून १० हजार रूपयांना खरेदी केली. ही बाईक सिंगल चार्जमध्ये १०० किमची रेंज देत असल्याचा दावा त्यानं केला आहे. याशिलाय ही बाईक शहरात ५० किमी प्रति तास आणि हायवे वर ५० किमी प्रति तास रेंज देत असल्याचं त्यानं सांगितलं. या बाईकमध्ये इंजिनच्या जागी आता लाकडाचा बॉक्स इन्स्टॉल केला आहे. तसंच यामध्ये बॅटरी ठेवण्यात आली आहे.

Read in English