Electric Scooter असावी तर अशी, दिवसाचा खर्च केवळ ३ रूपये; आठवड्यात दोनदा करा चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:20 PM2022-07-19T15:20:38+5:302022-07-19T15:23:59+5:30

इलेक्ट्रीक टू-व्हीलरची मागणी त्या स्कूटरची रेंज आणि प्रति किलोमीटर किती खर्च येईल यावर अवलंबून असते.

इलेक्ट्रीक टू-व्हीलरची मागणी त्या स्कूटरची रेंज आणि प्रति किलोमीटर किती खर्च येईल यावर अवलंबून असते. सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रीक स्कूटर्स उपलब्ध आहेत. परंतु टीव्हीएसचा दावा आहे की त्यांच्या iQube इलेक्ट्रीक स्कूटरचा दररोजचा खर्च केवळ 3 रुपये आहे.

होय, तुम्ही 3 रुपयांत दिवसभर फिरू शकता. 3 रूपयांमध्ये ही स्कूटर 30 किमी जात असल्याचा दावा टीव्हीएसनं केला आहे. खरंच ही इलेक्ट्रीक स्कूटर चालवण्याचा खर्च फक्त 3 रुपये प्रतिदिन असेल तर ती Ola S1 Pro, Bajaj Chetak Electric, Okinawa सारख्या कंपन्यांना मागे टाकू शकते. टीव्हीएसचे हे गणित या बातमीतून समजून घेऊया.

TVS Motors ने iQube च्या अधिकृत पेजवर आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत स्पष्ट केली आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे पेट्रोल वाहनासाठी प्रतिलिटर 100 रुपये खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत पेट्रोल स्कूटरवर 50,000 किमी चालण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो.

तर त्याच्या iQube इलेक्ट्रीक स्कूटरवरून 50,000 किमी प्रवास करण्याची किंमत 6,466 रुपये आहे. तसेच, जीएसटीही बचत होते. याशिवाय सर्व्हिस आणि मेन्टेनन्सचा खर्चही वाचतो. अशाप्रकारे iQube 50,000 किमीवर 93,500 रुपयांची बचत करते.

या स्कूटरचा सिंगल चार्जचा खर्च 18.75 रूपये आहे. iQube ST मॉडेल चार तास आणि सहा मिनिटांमध्ये फूल चार्ज होते. यानंतरही स्कूटर 145 किमीची रेंज देते. याचाच अर्थ तुम्ही रोज 30 किमी ही स्कूटर चालवल्यास तुम्हाला आठवड्यातून केवळ दोन वेळा ही स्कूटर चार्ज करावी लागेल. दोन वेळा चार्ज करण्याचा खर्च हा 37.50 रूपये असेल. महिन्याचा सरासरी खर्च 150 रूपये म्हणजेच दिवसाचा खर्च 3 रूपये असेल.

या स्कूटरच्या बेस व्हेरिअंटची दिल्लीत ऑनरोड किंमत 98654 रूपयांपासून सुरू होती. तर बंगळुरूत या स्कूटरची ऑनरोड किंमत 1,11,663 रूपयांपासून सुरू होते. मिड व्हेरिअंट iQube S ची किंमत दिल्लीत 1,08,690 रुपये, बंगळुरूत 1,19,663 रूपये आहे.

iQube ST ची दिल्लीतील किंमत 1,09,256 रूपये आहे. तर बंगळुरूत याची किंमत 1,20,183 रूपये आहे. या सर्व किंमत सब्सिडीनंतरच्या आहेत. ग्राहकांना जवळपास 51 हजार रूपयांची सब्सिडी देण्यात येत आहे.

ही स्कूटर सध्या 33 शहरांमध्ये उपलब्ध आहे. तसंच लवकरच ही आणखी 52 शहरांमध्ये लाँच केली जाईल. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही स्कूटर बूक करता येऊ शकते.