शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 08:12 PM2020-03-20T20:12:02+5:302020-03-20T20:13:35+5:30

शहरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

Urban areas restricted to sparrows; Natural equilibrium deterioration | शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती

शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो़ ग्रामीण भागात सद्यस्थितीला इतर पक्ष्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत चिमण्या

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : निसर्ग चक्रामध्ये इतर प्राण्यांमध्ये चिमण्यांनाही तेवढेच महत्त्व असले तरी धकाधकीची जीवनशैली, वाढते सिमेंटीकरण आणि  प्रदूषणाचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला आहे़ मागील काही वर्षामध्ये चिमणी संवर्धनासाठी जनजागृती झाल्याने ग्रामीण भागात चिमण्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले असले तरी शहरी भाग मात्र अद्यापही चिमण्यांसाठी प्रतिबंधित असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे शहरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो़ या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील चिमण्यांच्या स्थितीचा आढावा घेतला असता, ग्रामीण भागात सद्यस्थितीला इतर पक्ष्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत चिमण्या आढळत आहेत़ निमशहरी भागात हे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी शहरी भागात मात्र चिमण्यांचा चिवचिवाट मागील काही वर्षांपासून बंद झालेला आहे़ निसर्ग चक्रामध्ये प्रत्येक प्राणीमात्राला त्याचे महत्त्व अबाधित आहे़; परंतु, वाढते शहरीकरण चिमण्यांसाठी धोकादायक ठरले़ त्यातच इंटरनेट, मोबाईल फोनसाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या टॉवर्सचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर  दिसून आला़ त्यामुळे २००८ पर्यंत चिमण्यांचे प्रमाण घटलेलेच होते़ यात जनजागृती झाल्यानंतर हळूहळू चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे़ पक्षीमित्र त्यासाठी पुढाकार घेत आहेत. परभणी शहरात काही पक्षीमित्र चिमण्यांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात़  त्यात येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे यांचे संपूर्ण कुटुंबच चिमण्यांसाठी झटत असते़ त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात चिमण्यांचा आवास वाढलेला आहे़ तर बोरी येथेही पक्षीमित्र अंभुरे  हे मागील अनेक वर्षांपासून चिमण्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत़ शहरी भागात चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

का घटले चिमण्यांचे प्रमाण ?
बदलती जीवनशैली आणि रासायनिक कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर यामुळे चिमण्यांच्या मूलभूत गरजाच नष्ट झाल्या़ तसेच सर्वत्र वाढलेली सिमेंटची घरे, घरटे करण्यासाठी उपलब्ध नसलेली जागा, मोबाईल टॉवरच्या लहरी यामुळे चिमण्यांचे प्रमाण घटले आहे़ 

जगभरात चिमण्यांच्या २५ प्रजाती
पक्षीमित्रांनी केलेल्या अभ्यासात जगभरात चिमण्यांच्या २५ प्रजाती आढळल्या़ त्यामध्ये अरेबियन गोल्डन स्पॅरो, केप स्पॅरो, चेस्टनट स्पॅरो, डेसर्ट स्पॅरो, ग्रेट स्पॅरो,हाऊस स्पॅरो, लागो, इटालियन, नॉर्थन ग्रेहेड, पॅरोट बिल्ड, प्लेन बॅकड्, रुशेट, शैलेस, स्कोट्रा, सोमाली, स्पॅनिस आदी चिमण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे़ त्यात परभणी जिल्ह्यामध्ये हाऊस स्पॅरो ही एकमेव प्रजाती आढळते, असे पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी सांगितले़ 

चिमण्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी  घरटे लावून आश्रय द्यावा, अंगणात, छतावर, गॅलरीत चिमण्यांसाठी पिण्याचे पाणी व खाद्य देण्याची व्यवस्था करावी़ हे घरटे घराच्या गॅलरीत किंवा बागेत लावल्यास चिमण्यांचा वावर वाढण्यास मदत होईल़
-अनिल उरटवाड, पक्षीमित्र

Web Title: Urban areas restricted to sparrows; Natural equilibrium deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.