परभणी हादरले! सेलूमध्ये दोन तरुणांवर चाकू हल्ला; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:36 IST2026-04-17T19:36:19+5:302026-04-17T19:36:48+5:30
मध्यरात्री वादाचे पर्यवसान रक्ताच्या थारोळ्यात; सेलू शहरात तणावपूर्ण शांतता.

परभणी हादरले! सेलूमध्ये दोन तरुणांवर चाकू हल्ला; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
सेलू (जि. परभणी): शहरातील गायत्रीनगर भागात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या वादातून दोन तरुणांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात आदित्य मिलिंद प्रधान हा तरुण गंभीर जखमी झाला होता, ज्याचा शुक्रवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील दुसरा जखमी तरुण आनंद दगडू ढोले याच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्री झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गायत्रीनगर परिसरात काही जणांमध्ये भांडण सुरू झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी धारदार चाकूने आनंद ढोले याच्या छातीवर, तर आदित्य प्रधान याच्या कंबरेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही नातेवाइकांनी तातडीने सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान मृत्यू
प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही परभणीला हलवण्यात आले. मात्र, आदित्यची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाइकांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जबाबांनंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.