Parabhani: उसाच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर पुंगी बजाव आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:07 IST2025-09-22T18:07:06+5:302025-09-22T18:07:53+5:30
साेनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन युनिट टू कारखाना

Parabhani: उसाच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचे साखर कारखान्यासमोर पुंगी बजाव आंदोलन
सोनपेठ : ऊस बिलातील फरकाची रक्कम देण्याच्या मागणीसाठी सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन युनिट टू कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंडळाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सन २०२४-२५ हंगामात कारखान्याने उसाचे बिल प्रति टन २७०० रुपये देणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांना फक्त २५०० रुपयेच देण्यात आले असून, उर्वरित फरकातील २०० रुपये अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही तसेच २०२५-२६ हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसाचे दर जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. यावेळी परिसरातील इतर कारखान्यांनी मागील वर्षी २७०० रुपये प्रति टन दर दिला असून ट्वेन्टी वन युनिट टू कारखान्याने कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन करूनही कारखाना प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
शेतकरी संकटात सापडले असताना कारखाना प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. दरम्यान, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर पुंगी वाजवत आंदोलन केले. यावेळी मंडळ अधिकारी शिवाजी कराड यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व रामेश्वर मोकाशे यांनी केले असून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.