स्वस्तातील सोन्याचे आमिष पडले महागात; तरुणाला मारहाण करून सहा लाखाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:29 PM2021-01-05T16:29:30+5:302021-01-05T16:31:28+5:30

परळी- गंगाखेड रस्त्यावरील गोविंदवाडी येथे एका शेतात चार जणांनी मारहाण करून लुटले

The lure of cheap gold fell expensive; Six lakh was looted by beating the youth | स्वस्तातील सोन्याचे आमिष पडले महागात; तरुणाला मारहाण करून सहा लाखाला लुटले

स्वस्तातील सोन्याचे आमिष पडले महागात; तरुणाला मारहाण करून सहा लाखाला लुटले

Next
ठळक मुद्देपरभणी जिल्ह्यातील घटनाचौघांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना अटक

सोनपेठ (जि. परभणी) : कमी किमतीत सोने देण्याचा बहाणा करीत एकास मारहाण करून रोख सहा लाख रुपयांना फसविल्याची घटना ३ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात घडली आहे.

माहूर तालुक्यातील बोरड येथील रहिवासी असलेला सागर गंभीर राठोड हा माहूर येथील एका महाराजाच्या संपर्कात होता. या महाराजांना एक व्यक्ती कमी किमतीत सोने देण्याबाबत वारंवार फोन करीत असे. मात्र, महाराजांकडे पैसे नसल्याने त्यांनी ही बाब सागर राठोड यांना सांगून त्यांना संबंधित व्यक्तीचा मोबाइल क्रमांक दिला. सागर राठोड यांनी या व्यक्तीस आठ दिवसांपूर्वी फोन केला होता. त्यानंतर परत या व्यक्तीने २ जानेवारी रोजी सागर यांना फोन केला. सोने पाहिजे असेल तर गंगाखेड येथे येण्याचे सांगितले. 

३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सागर राठोड हे गंगाखेड येथे आले. त्यावेळी त्यांना मोटारसायकलवर आलेल्या एका व्यक्तीने संपर्क साधून आमच्या पाठीमागे येण्यास सांगितले. सागर राठोड हे कार घेऊन मोटारसायकलच्या मागे गेले. परळी- गंगाखेड रस्त्यावरील गोविंदवाडी येथे एका शेतात त्यांना उभे करण्यात आले. याच वेळी चौघांनी सागर यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यांना मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सागर राठोड यांच्याकडील चार लाख ३५ हजार रुपये, २१ ग्रॅमचे सोने आणि मोबाइल असा सहा लाख १६ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. याप्रकरणी सागर राठोड यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तीन आरोपी गजाआड
सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, कर्मचारी वशिष्ट भिसे, राहुल परसोडे यांनी ३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी शिवारात कापसाच्या शेतात दडून बसलेल्या दीपक गिरमिल्या भोसले (१८), मंगलबाई गिरमिल्या भोसले (४०) आणि शीतल प्रदीप पवार (२५, सर्व रा. महातपुरी तांडा, ता. गंगाखेड) यांना अटक केली. या आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The lure of cheap gold fell expensive; Six lakh was looted by beating the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.