विनामास्क फिरल्याचा दंड लावल्याने दोघा भावांची पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 07:46 PM2021-02-27T19:46:57+5:302021-02-27T19:48:02+5:30

corona virus दंड भरावाच लागेल असे सांगितले असता दुचाकी चालक आणि त्याच्या भावाने चौकात गोंधळ घातला

corona virus : Two brothers attacks on police for traveling without mask | विनामास्क फिरल्याचा दंड लावल्याने दोघा भावांची पोलिसांना मारहाण

विनामास्क फिरल्याचा दंड लावल्याने दोघा भावांची पोलिसांना मारहाण

Next

गंगाखेड : विनामास्क फिरणाऱ्या दोघा भावांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याने त्यांनी हुज्जत घालून पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. २६ ) सायंकाळी होळकर चौक परिसरात घडली. याप्रकरणी वैजनाथ बाबुराव सोलव व त्याचा भाऊ उद्धव सोलव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी ( दि. २६ )  गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गोविंद गिते, दिपककुमार वाव्हळे, पोलीस शिपाई चंद्रशेखर कावळे, राजेंद्र कुमरे, भताणे आदी पोलीस कर्मचारी शहरातील होळकर चौक परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत होते. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या तोंडाला मास्क नसल्याने पोलीसांनी त्यांना थांबवून दंड भरण्यास सांगितले. यावेळी दुचाकी चालकाने तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे ?  खिशात मास्क आहे परंतु मी लावला नाही असे म्हणत पोलीसांसोबत हुज्जत घातली. 

पो. ना. गोविंद गिते यांनी दंड भरावाच लागेल असे सांगितले असता दुचाकी चालक वैजनाथ बाबुराव सोलव व त्याचा भाऊ उद्धव सोलव ( दोघे रा. सुरळवाडी ता. गंगाखेड ) यांनी दंड भरणार असा आरडाओरडा करत भरचौकात गोंधळ घातला. यावेळी पोलीस वाहनातून आलेल्या जमादार रंगनाथ देवकर यांनी वाहन थांबवून गोंधळ का घालता असे विचारले असता वैजनाथ सोलव याने त्यांच्या तोंडाचा मास्क ओढून झटापट केली. यावेळी अन्य पोलीसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला दोघा भावांनी पोलीस कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतरही त्यांनी गोंधळ सुरूच ठेवला होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहेत.

Web Title: corona virus : Two brothers attacks on police for traveling without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.