तरूण मुलं आज सुखी समाधानी का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:20 AM2019-07-18T06:20:12+5:302019-07-18T06:25:02+5:30

तरुण मुलांकडे आज साधनं आहेत;पण स्वास्थ्य नाही. ते कनेक्टेड आहेत; पण स्वत:पासून तुटलेत, असं का?

Why are young children not happy today? | तरूण मुलं आज सुखी समाधानी का नाहीत?

तरूण मुलं आज सुखी समाधानी का नाहीत?

Next

-प्रा. मधुकर चुटे

आजच्या प्रचंड वेगवान युगामध्ये जेवढी भौतिक सुखं प्राप्त होतात, तशाच अनेक समस्याही वेगाने तयार होतात. त्यातलाच एक भाग म्हणजे आजच्या तरुणाईचा असा समज झाला आहे, की विज्ञान-तंत्नज्ञान हीच आपल्या सुखाची किल्ली आणि दु:खावर मात्रा आहे.  हे अगदीच खरं आहे की, तंत्रज्ञानामुळे आज तरुणाईचे कष्ट कमी झालेत. किंवा कमी कष्टात भरपूर पैसा आणि सुविधांचं सुख मिळू लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आज तरुण अनेक संकटांवर मात करू शकतात. सगळं जगच खूप जवळ आलं आहे. एकाच ठिकाणी बसून आपली अनेक कामं करणं सहज शक्य झालं आहे. 
पण मग असं असूनही ही तरुण मुलं मनापासून सुखी किंवा समाधानी का वाटत नाहीत? करिअर, उत्तम पगार एकीकडे कमावणारे अनेकजण आहेत; पण त्यापायी त्यांची जीवनशैलीसुद्धा बदलते आहे. पैसे आहेत, अनेक प्रकारची सुखसाधनं आहेत; पण मानसिक समाधान नाही. अनेक लाइफ स्टाइल डिसीज अर्थात आजार तारुण्यातच जवळ येत आहेत, ते का? याचाही तरुणांनी विचार करायला हवा. 
ताण-तणावाचा आणि धावपळीचा परिणाम आजच्या तरु ण वर्गावर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतोय. जे आजार किंवा व्याधी साठाव्या वर्षी येऊ शकतात त्या तीस ते चाळीसव्या वर्षीच तरुणांवर आक्रमण करीत आहेत. 
हे असं होण्यामागची कारणं काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, अनेक तरुणांना भेटतो, त्यातून मला या काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. 

1) मोठय़ा पगाराच्या नोकरीसाठी वाट्टेल तितका वेळ काम करावं लागते. कोणत्याही व्यक्तींची काम करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता ठरलेली असते. म्हणजे जास्तीत जास्त आठ ते दहा तास काम करणं कोणालाही सहज शक्य होतं; परंतु आज बारा ते सोळा तास एवढं काम अनेकजण करतात. याशिवाय घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर बसून उरलेली कामं करावी लागतात. ऑफिसच्या कामासाठी करावा लागणा-या प्रवासाची तयारी ठेवावी लागते.
 

2. आज बाविसाव्या किंवा तेविसाव्या वर्षी नोकरीला लागलेला तरुण किंवा तरुणी पुढच्या दहा वर्षांमध्ये याच पद्धतीने सोळा-सोळा तास काम सतत करत असतात. म्हणजे वयाच्या तीस-पस्तीसाव्या वर्षी त्यांची शारीरिक आणि  मानसिक क्षमता कमी होऊ लागते. ही मुलं एक्झॉस्ट किंवा बर्न आउट झाल्यासारखी दिसतात. होतातही. 

3. नैराश्य किंवा एकटेपणा हीदेखील एक मोठी समस्या ठरत आहे. कारण आजच्या सगळ्या या आधुनिक जीवनशैलीमुळे  तरुणवर्ग सतत इंटरनेट किंवा मोबाइलच्या संपर्कात असतो. चोवीस तासांपैकी त्याचे सहा ते आठ तास हे मोबाइल किंवा इंटरनेटमध्येच खर्च होत असतात. याचा परिणाम असा होतो की आजच्या  तरुणाईकडे स्वत:साठी कोणताही वेळ उरत नाही. कारण या दोन्ही गोष्टींमुळे ते आपल्या मित्रांशी बोलत राहतात. सोशल नेटवर्किंगमुळे काही ना काही चर्चा करत राहतात. परंतु आपल्या मनाला किंवा मेंदूलासुद्धा थोडावेळ ते विश्रांती देऊ शकत नाही. इतरांशी मोबाइलवरून गप्पा मारण्यातच त्यांचा वेळ जात असतो. मग त्यांच्याकडे स्वत:साठी कोणताच वेळ उरत नाही. या सगळ्या आकर्षणामुळे तरुणवर्ग त्यांच्या घरातील लोकांशीसुद्धा संपर्कात राहत नाही, संवादही होत नाही. मग रिकामं मन त्यांना सतत अस्वस्थ करत राहते. 

4. हायपर टेन्शन , डिप्रेशन किंवा हृदयरोग यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसते. देशातील तरुणाई तरु ण वयात जर अशा अकाली आजारांना बळी पडली तर ते देशासाठी मोठंच नुकसान म्हणावं लागेल. हे सारं  गंभीर आहे. तेव्हा तरुण मुलांनी जरा स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार केलेला बरा. 

( लेखक नागपूरस्थित महाविद्यालयात व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख आहेत.)

Web Title: Why are young children not happy today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.