spitting on the road? why youth are so careless? | शहरांत-गावांत कुठंही पचापच थुंकणार्‍या तरुणांना काही थेट सवाल
शहरांत-गावांत कुठंही पचापच थुंकणार्‍या तरुणांना काही थेट सवाल

ठळक मुद्देकुठेही पचकन थुकणं म्हणजे स्टाइल मारणं नाही बॉस! 

- प्राची पाठक 

चौकाचौकांत, गावांत-शहरांत, बस स्टँडच्या आडोशाने, पानटपर्‍यांवर लहानसा घोळका करून चकाटय़ा पिटणार्‍या मुलांमध्ये असतात तरी कोण मुलं? 
कुठून येतात ही तरु ण टोळकी? 
नेमकं काय करत असतात घोळक्यांमध्ये? 
चित्न-विचित्न हेअर स्टाइल्स, वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे, आजूबाजूला पार्क करून ठेवलेल्या बुलेटपासून ते माउंटन बाइक्स सायकलर्पयतच्या विविध गाडय़ा, हातात महागडे फोन्स, फोनमध्ये डोकं  खुपसून सुरू असलेली खुसर-पुसर इतकंच या मुलांचं वैशिष्टय़ नसतं. फोनमध्ये एकत्न गेम्स खेळणं सुरु  असतं काहींचं. कोणाचं व्हिडीओ पाहणं सुरू असतं. कोणी कसलं शूटिंग करत असतात, तर कोणी कसले मेसेजेस चेक करत असतात. कोणाचं सेल्फी घेणं सुरू  असतं. इथेच ही गोष्ट संपत नाही. त्यांच्या ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीची समाधी भंग करून काहीतरी प्रश्न विचारावा या मुलांना. एखादा रस्ता, एखादा पत्ता विचारावा. मग त्यांच्यातला मेन हिरो पुढे येतो आणि सर्वात आधी काय करतो, तर पचकन थुंकतो. जिथे दिसेल तिथे पचकन थुंकतो. थुंकल्याशिवाय तो तोंडच उघडू शकत नसतो.
तोंडात बराच वेळापासून काहीतरी घोळवत ठेवलेले अनेक लोक थुंकायला मिळत नाही, तोवर खाणाखुणांच्या भाषेत बोलत राहतात. अगदीच अनावर झालं की बोलता बोलता समोरच्याच्या बाजूलाच पचकन थुंकून येतात आणि तोंडातून थुंकीचे थेंब उडवत बोलायला लागतात. त्यात किशोरवयीन मुलं, तरुण, वयस्क पुरुष असतात. ते शिकलेले असो की अशिक्षित असो, आपल्या तोंडात जे मुळातच थुंकून टाकावं लागतं, इतकं टाकाऊ काहीतरी तासन्तास घोळवत बसतात. जिथे जागा सापडेल तिथे थुंकत राहतात. 
सार्वजनिक जागी पचापच थुंकू नाही, वगैरे शाळेत शिकलेलं शाळेतच सोडायचं असतं असं वाटतं का यांना? शाळेच्याच कोपर्‍यात कुठेतरी पिंक टाकत असतात. कॉलेजला गेलो, हाताला-पोटाला काही काम मिळवलं, कोणी इलेक्ट्रिशियन झालं, कोणी प्लंबर, कोणी रिक्षावाला, कोणी गवंडी, कोणी आयटीवाला, कोणी पोलिसांत गेलं, कोणी शिक्षक झालं, कोणी इंजिनिअर तरी थुंकणं काही सुटत नाही. तुमच्याकडे भारीतली बुलेट असो की आणखीन महागडी कार. बुलेट चालवत, कारची काच खाली करत आम्ही थुंकणार म्हणजे थुंकणारच! जणू रस्त्यावर थुंकणं आपला अधिकार आहे आणि त्याविरुद्ध कोणी अगदी सहज काही बोललं तरी त्याच्या अंगावरच धावून जायचं लायसन्ससुद्धा आपल्याला मिळालेलंच आहे.
पुन्हा कुणी हटकलंच तर ते  समोरच्यालाच विचारतात.
‘इथे नाही, तर कुठे थुंकू?’ 
‘आली थुंकी तोंडात, तर काय घरी जाऊ का थुंकायला?’ 
‘सगळेच थुंकतात, तर मी का नको थुंकू?’ 
‘त्या माणसाला आधी बोलून या, मग मला सांगा थुंकू नको ते’
‘इथे आधीच घाण आहे. मी थुंकलं तर काय फरक पडतो?’
‘कोण म्हणालं, थुंकीतून रोगराई वाढते?’
आपलं शिक्षण, आपलं पद, आपल्या हातात पालकांच्या कृपेने असलेला इझी मनी, आपण चालवत असलेल्या बाइक्स, घालत असलेले ब्रँडेड कपडे, शूज, हातातले मोबाइल्स आणि आपलं थुंकणं यांचा काहीही संबंध नसतो. सार्वजनिक स्वच्छता वगैरे मुद्दे थेट डस्टबिनमध्येच. ते फक्त बोलायला असतं! सार्वजनिक स्वच्छतेचं एक वेळ सोडून देऊ, स्वतर्‍च्या आरोग्याचं तरी भान असावं. अशी कोणती उबळ असते की सतत रस्त्यावर थुंकावं लागेल असं आपण काहीतरी आपल्या तोंडात सारत असतो सतत? काय खातो मावा की गुटखा?
आपल्या थुंकीतून रोगराई पसरू शकते, इतरांना ते किळसवाणं वाटू शकतं, याचं किमान भान तरी ठेवतो का आपण? शिक्षण आणि सामाजिक, आर्थिकस्तर याच्या पलीकडे जाऊन ते सार्वजनिक जागी थुंकायची सवय बाळगून असतात. इतकं की नवीन इमारत झाली, जुन्या इमारतीला रंगरंगोटी झाली की लोक कोपर्‍या-कोपर्‍्यात देवांचे फोटो लावून ठेवतात. तरीही लोक थुंकतच असतात.
घरात, मित्नांमध्ये घुमे म्हणून प्रसिद्ध असलेले तरु ण मुलं, पुरुष तोंड उघडतात की नाही, मनातलं बोलतात की नाही, असे प्रश्न पडणार्‍या लोकांना गमतीत सांगितलं जातं, ‘तो फक्त थुंकायलाच तोंड उघडतो. बाकी, आजकालच्या तरु ण मुलांच्या मनात नेमकं  काय सुरु  असतं, ते सांगणं अवघडच’. 
तंबाखू, पान, खर्रा, सिगारेट्स हे आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे का, की आपल्या आरोग्याशी हेळसांड करून आपण असे रस्त्यावर पचापच थुंकणारे होऊन जातो? चुईंग गम्स आपण स्टाइलसाठी खाणार आणि खाऊन झाल्यावर तोंडात उरलेलं चुईंग गम कुठेतरी चिकटवून ठेवणार. कुठेतरी पचकन थुंकणार. इतरांना त्याने त्नास होईल याची जाणीवदेखील आपण ठेवणार नाही. 
का थुंकत असतो आपण सार्वजनिक जागी? कफ अनावर झाल्यावर लोकांना थुंकावं लागतं. विशिष्ट पान-तंबाखू खाल्ल्यावर थुंकावं लागतं. पण मुळात जे तोंडात टाकून बाहेर फेकून द्यायच्या लायकीचं आहे, ते आपण आपल्या शरीरात ढकलतोच कशाला? त्यातून कफ वाढणार आणि पुन्हा थुंकण्याची उबळ येणार. आपलं स्वतर्‍चं थुंकीपात्न घेऊन घरातून बाहेर पडावं का मग, जे कायम आपल्या सोबत राहील? कॉलेजचं प्रोजेक्ट म्हणून आपण किमान एखादं आधुनिक, सुटसुटीत थुंकीपात्नच का विकसित करू नये?
आपल्या आजूबाजूचे तरु ण सतत का थुंकत असतात, त्यांच्याशी बोलायचं का प्रेमाने? आपल्या हातातला मोबाइल आपल्याला एकदम भारीतला हवा असतो. त्याला झकास अ‍ॅक्सेसरीज आपण जोडतो. कपडे ब्रँडेड घालतो, शूज भारीतले आणतो. परवडत नसेल, तर कधी ना कधी आपण असे शूज, असे कपडे, अशा बाइक्स आणि अशा कार घेऊनच राहू अशी स्वप्न बघतो. ती स्वप्न साकारायला जे शरीर आपल्याला साथ देणार असतं, त्याची अशी कचराकुंडी का करून ठेवतो आपण? आपल्या तोंडात अशी काय घाण साचते की आपल्याला ती सारखी बाहेर थुंकत बसावी लागते? 
विचार करूया..सार्वजनिक जागी पचकन थुंकणार्‍या आपल्या मित्न-मैत्रिणींनासुद्धा विचार करायला भाग पाडूया. 
कुठेही पचकन थुकणं म्हणजे स्टाइल मारणं नाही बॉस!  

Web Title: spitting on the road? why youth are so careless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.