आठवडय़ातले पाच तास शिका, नाही तर तुमचं करिअर बरबाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 07:20 AM2019-10-17T07:20:00+5:302019-10-17T07:20:04+5:30

सतत नवनव्या गोष्टी शिकणं, नवी स्किल्स शिकून घेणं, त्यात भर घालणं, वाचणं, नव्या गोष्टी नव्या पद्धतीनं करणं हे सारं आता ‘लक्झरी’ राहिलेलं नाही किंवा हौसेपुरतंही मर्यादित उरलेलं नाही. हे सारं नाही केलं, तर नव्या जगात हाताला काम मिळणंच मुश्कील होईल, करिअरची तर बातच सोडा!

Learn five hours a week, otherwise your career will be ruined! | आठवडय़ातले पाच तास शिका, नाही तर तुमचं करिअर बरबाद !

आठवडय़ातले पाच तास शिका, नाही तर तुमचं करिअर बरबाद !

Next
ठळक मुद्देआपण रोज कमीत कमी 15 मिनिटं तरी नवीन काही शिकण्याला कसे  देऊ यासाठी प्रत्येकानं कोणतेही कारण न देता धडपड करायला हवी. 

- माधुरी पेठकर 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा अध्यक्षपदी होते. तेव्हा ते जगातल्या कोणाहीपेक्षा जास्त कामात व्यस्त होते. पण तरीही ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून किमान एक तास कार्यालयात बसून वाचन करत असत. तेही रोज. का?
**
वॉरन बफे हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. तेही आपल्या संपूर्ण दिवसातला 80 टक्के वेळ हा वाचन, मनन आणि चिंतनासाठी देत असत. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी हा नियम पाळला. तो का?
**
बिल गेट्स जगातला सर्वात श्रीमंत माणूस. तेसुद्धा दर आठवडय़ाला एक पुस्तक वाचून पूर्ण करतात. आणि वर्षातून दोन आठवडय़ांची पुस्तक वाचन सुटी (पुस्तक वाचण्यासाठी सुटी) घेतात. करिअरच्या सुरुवातीपासून त्यांच्या या सवयीत आजही काहीच बदल झाला नाही. तो का?
**
आज जगातले हुशार, यशस्वी आणि कामात व्यस्त असलेली माणसं दिवसातून एक तास शिकण्यासाठी असे आठवडय़ातून पाच तास शिकण्यासाठी काढतात; पण दुसर्‍या बाजूला इतर सामान्य लोकं मात्र शिकायला कुठे वेळ आहे, अशी न पटणारी कारणं देत राहतात.
** 
या लोकांना या शिकण्यात असं काय दिसलं जे इतरांना दिसत नाहीये?
उत्तर अगदीच साधं आणि सोपं आहे. या लोकांना आजच्या घडीला शिकणं ही सर्वात मोठी गुंतवणूक वाटते. जी आपण सहज करू शकतो. किंवा बेंजामिन फ्रॅँकलिन म्हणतात तसे ज्ञानातली गुंतवणूक ही आज जगातली  सर्वात जास्त व्याज किंवा परतावा देणारी गुंतवणूक आहे. 
बौद्धिक जगात यशस्वी होण्यासाठी ज्ञान हेच आपले मुख्य माध्यम आहे.  काही लोकांना याची जाणीव झाली आहे. सुदैवानं जर तुम्हाला ज्ञानाचं मूल्य वेळेत समजलं तर तुम्हाला खूप काही मिळवता येतं. त्यासाठी फक्त रोज काही वेळ नियमितपणे शिकण्यासाठी द्यायलाच हवा. 

नॉलेज इज न्यू करन्सी!
आपण आपलं संपूर्ण आयुष्य पैसा जमवण्यात, तो खर्च करण्यात आणि त्या पैशाचा उपभोग घेण्यात खर्च करतो. आणि आयुष्याच्या शेवटी परत पैशाच्या काळजीत गढून जातो. जेव्हा आपण असं म्हणतो की ‘नवीन शिकायला माझ्याकडे वेळ आहेच कुठे?’ तेव्हा आपण पैशाच्या मागे वेडय़ासारखे धावत सुटलेलो असतो. पण ज्ञान आणि पैशातलं नातं आता बदलत चाललंय हे तुम्हाला माहिती आहे का? पैशापेक्षाही ज्ञानाचं मूल्य आजच्या बाजारपेठेत कैकपटीनं वाढलं आहे, हे आपल्या गावी तरी आहे का?
प्रसिद्ध भविष्यवेत्ता पीटर डायमंडीज म्हणतात तसे आज आपण त्या काळाच्या अगदी उंबरठय़ावर उभं आहोत, जिथे दिवसेंदिवस वेगानं बदलत जाणार्‍या तंत्रज्ञानामुळे  पैसा या चलनाचं मूल्य कमी कमीच होत जाणार आहे. कारण येणार्‍या आणि बदलणार्‍या तंत्रज्ञानामुळे आज ज्या वस्तू, उत्पादनं आणि सेवांची अव्वाची सव्वा किंमत आहे ते येता काळात अगदीच नगण्य किमतीला उपलब्ध होणार आहेत. काही गोष्टी तर कदाचित आपल्याला यापुढे विनामूल्यही (फुकट) मिळू शकतील. 
भविष्यात पैशाची अवमूल्यन गती झपाटय़ानं वाढणार आहे. वाहन क्षेत्रात एवढी क्रांती होणार आहे की भविष्यात चारचाकी गाडी घेण्याची आपली गरजच संपून जाईल. सगळ्या गोष्टी जागच्या जागी अनुभवू शकू असं तंत्रज्ञान भविष्यात येऊ घातलं आहे. एखादा गाण्याचा कार्यक्रम किंवा गोल्फचा सामना बघण्यासाठी प्रत्यक्ष गाडी चालवत जाण्याची गरज राहणार नाही. आपण तिथे प्रत्यक्ष प्रवास करून त्या कार्यक्रमाचा किंवा सामन्याचा आस्वाद घेतो आहोत असा आनंदी आभास लवकरच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. वास्तव आणि आभास यामधलं अंतर आज जाणवण्याइतपत असलं तरी भविष्यात वास्तव आणि आभासातलं अंतर झपाटय़ानं कमी होत जाणार आहे. 
आज शिक्षण आणि वैद्यकीय सेवा न परवडण्याच्या टप्प्यातल्या आहेत. पण तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्था सर्व आर्थिक स्तरातील विद्याथ्र्याना परवडतील अशा शैक्षणिक सुविधा आणि सवलती देण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्यानं सुरू होणार्‍या शैक्षणिक संस्था ऑनलाइन शिकण्याचे पर्याय देत आहेत. शिवाय माफक दरात शिकण्याच्या सोयी उपलब्ध करून देत आहेत. 
याचाच अर्थ उत्पादनं आणि सेवा यांचा दर भविष्यात कमीच होत जाणार आहे. फक्त एकाच गोष्टीचं महत्त्व वाढत जाणार आहे. ती म्हणजे ज्ञान. 
आज ज्ञानाची किंमत जगात कशी वाढत चालली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुगल एक्स आणि गुगल सेफ्ल ड्रायव्हिंग कार या आधुनिक तंत्रज्ञानाचा संस्थापक सेबास्टिअन थ्रुन यांचं एक विधान. ते म्हणतात,  उबर ही 70 कर्मचार्‍यांवर 700 मिलियन डॉलर खर्च करते. याचा अर्थ या उद्योग संस्थेचा हुशारीची किंमत मोजण्याचा दर प्रत्येक दहा मिलियन डॉलरइतका जास्त आहे. हे उदाहरण फक्त एवढय़ाच एका उद्योगापुरतं सीमित नाही, तर जे भविष्यासाठी कोणते कौशल्य उपयुक्त आहे हे ओळखून त्यानुसार भविष्यात पाऊल टाकणारा कोणीही माहिती विश्लेषक, प्रोडक्ट डिझायनर, फिजिकल थेरेपिस्ट आपल्या करिअरची स्पर्धा सहज जिंकू शकणार आहे. 
जे नोकरी-व्यवसाय करताना रात्रंदिवस खूप कष्ट करतात, पण आपल्या कामाच्या चौकटीतून बाहेर पडून जे नवीन काही शिकण्यासाठी थोडाही वेळ काढत नाहीत ते करिअरच्या स्पर्धेत टिकून राहण्याच्या योग्यतेचे ठरणार नाहीत. ते या स्पर्धेतून बाद होतील. औद्योगिक क्रांती झाल्यावर ज्याप्रमाणे कामगारांचे रोजगार गेले, त्याप्रमाणे भविष्यात नवीन काही शिकण्याकडे पाठ फिरवणार्‍यांच्याही नोकर्‍या जातील हे नक्की.
पण का?
 कारण आज ज्ञानाचं हे चलन पैशाच्या चलनाइतकंच किंबहुना पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं झालं आहे. आज ज्ञानालाच पैशाचं स्वरूप आलं आहे. आज ज्ञानाला देवाण-घेवाणीचं माध्यम मानलं जातं. आज ज्ञान हेसुद्धा पैशासारखं साठवून ठेवता येतं. वाढवता येतं. 
ज्ञानामुळे तुमच्याकडची शब्दसंपत्ती वाढते. ज्ञानामुळे तुम्ही जगातल्या कोणाशीही उत्तम संवाद साधू शकतात. हे ज्ञानच आपल्या जगण्याला विशिष्ट दृष्टिकोन देतं. या ज्ञानामुळेच आपण एकाच वेळी अनेक जगण्याचा, अनेकांच्या विचारांचा आणि हुशारीचा अनुभव घेऊ शकतो. 

******************

नव्या गोष्टी शिकणं अवघड नसतं. त्यासाठी फक्त या सहा गोष्टींची आवश्यकता आहे. 

1) योग्य वेळी उपयुक्त गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. ज्या लोकांना आपल्यासाठी काय उपयुक्त आहे याची जाणीव होते ते यशाच्या वरच्या टप्प्यावर असतात. आज उद्योगजगात रोज क्रांती होते. या क्षेत्रात सतत नवीन कौशल्य ंआत्मसात केलेल्या लोकांची गरज असते; पण ही कमतरता मात्र तीव्रतेनं भासत राहते, कारण ही कौशल्यं शिकणार्‍या व्यक्तींची कमतरता. जर आपण आधुनिक उद्योगांना आवश्यक असणारी कौशल्यं वेळेत आणि पटकन शिकू शकलो तर त्याचा भरघोस मोबदलाही मिळतो. कौशल्य शिकून घेण्याच्या संधीकडे बघता यायला हवं. 
2) आपल्याकडे जे कौशल्य आहे ते इतरांर्पयत पोहोचवता आलं पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे काय वेगळं आहे हे इतरांना कसं कळेल? म्हणूनच आज एकापेक्षा जास्त कौशल्यं शिकून घेण्याची गरज आहे. जे येतं ते ठासून सांगण्याची आणि सिद्ध करून दाखवता येण्याची गरज आहे.  
3) आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं रूपांतर पैशात आणि योग्य त्या परिणामात करता यायला हवं. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर आणि मोबदला मिळेल अशी नोकरीची संधी शोधता यायला हवी. आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून भक्कम पाया असलेला व्यवसाय उभा करता यायला हवा. शिकण्याचा उपयोग जास्तीत जास्त मोबदला देणार्‍या गुंतवणुकीत कसा करता येईल हे शिकायला हवं. 
4) घाईघाईनं पुष्कळ काही शिकून घेता यायला हवं. काळाच्या कसोटीवर आपलं ज्ञान किती वाढतं यावर आपला शिकण्याचा वेग किती हे ठरतं. वेळेवर मात करेल इतका ज्ञानाचा साठा वाढवायचा असेल तर कमी वेळात जास्त आणि विविध अशा गोष्टी शिकता यायला हव्यात. 
5) पैसे कमावण्याच्या उद्देशावरून आपल्याला आपलं ध्येय ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाकडे वळवायला हवं. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल आणि टिकून राहायचं असेल तर सतत शिकता यायला हवं. जर आठवडय़ातून पाच तास म्हणजे रोज एक तास आपण नवीन काही शिकलो नाही तर या पुढच्या काळात आपलं काही खरं नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. 
6) बेन क्लार्क हा एक यशस्वी उद्योजक. तो रोज सकाळी पावणेसात ते साडेआठ असा वेळ फक्त शिकण्यासाठी ठेवायचा. आपण कारणं देतो. ती कारणं देणं टाळून, आळस सोडून, नियमितपणा अंगी यायला हवा. आपण रोज कमीत कमी 15 मिनिटं तरी नवीन काही शिकण्याला कसे  देऊ यासाठी प्रत्येकानं कोणतेही कारण न देता धडपड करायला हवी. 

********************

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की, ज्यावेळी माझ्या आजूबाजूला अनेक गोष्टी प्रचंड वेगानं घडत होत्या, चारी बाजूनं वेगानं माहिती माझ्यार्पयत पोहोचत होती, त्याच काळात प्रसंगानुसार स्वतर्‍चा वेग कमी करण्याची क्षमता माझ्यात पुस्तक वाचनानच निर्माण केली. माझ्या अनुभवाला दृष्टिकोन माझ्या पुस्तक वाचनानेच दिला. या पुस्तक वाचनामुळेच मला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हुशारीची, त्याच्यातल्या कौशल्याची जाणीव होऊ शकली. पुस्तक वाचनानं मला मिळालेल्या या गोष्टी खूपच मौल्यवान आहेत. या गोष्टींमुळे मी चांगला राष्ट्राध्यक्ष झालो का हे मला महीत नाही; पण आठ वर्षाच्या राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीत माझ्यातल्या माणसाचा तोल मला यामुळे सांभाळता आला हे मात्र नक्की.  


( माधुरी लोकमत वृत्तपत्र समूहात उपसंपादक आहे.)
( लेखासाठी संदर्भ- मीडिअम डॉट कॉम आणि क्वार्टझ या वेबसाइट्सच्या सौजन्याने)

 

Web Title: Learn five hours a week, otherwise your career will be ruined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.