coronavirus : कोरोना म्हणतो स्टॅच्यू! कोरोना  काळात  लाईफ  बदलून  टाकायचं  आहे ? TRY THIS

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 04:19 PM2020-04-02T16:19:55+5:302020-04-02T16:32:08+5:30

आपली गाडी खटाराच आहे, इतरांची गाडी पॉश आहे असं म्हणत रडत राहायचं की आपल्या गाडीचं मस्त सव्र्हिसिंग करून तिला नवी कोरी, रेसरेडी करायचं हे आपल्याच हातात आहे. बघा तुमचा चॉइस काय आहे?

coronavirus: Corona says Statue!- life changing things you can do when staying at home in corona time. | coronavirus : कोरोना म्हणतो स्टॅच्यू! कोरोना  काळात  लाईफ  बदलून  टाकायचं  आहे ? TRY THIS

coronavirus : कोरोना म्हणतो स्टॅच्यू! कोरोना  काळात  लाईफ  बदलून  टाकायचं  आहे ? TRY THIS

googlenewsNext
ठळक मुद्देएकच लक्षात ठेवायचं, आपली शरीर-मनाची गाडी झकास हवी. ती झकास करायला छोटय़ा छोटय़ा स्टेप्स आखून कामाला लागायचं..

-प्राची पाठक

तो एक ‘स्टॅच्यू’ नावाचा खेळ लहानपणी खेळल्याचं आठवतंय? 
सगळ्या टीममध्ये एक कोणीतरी येतो आणि त्याला वाटेल तेव्हा सगळ्यांना एक कमांड देतो.  ‘स्टॅच्यू’. 
आणि मग सगळे जिथं असतील तिथं, जसे असतील तसे उभे राहातात किंवा बसून राहातात. ही कमांड मिळाली रे मिळाली की अजिबात चालायचं नाही. ज्या अवस्थेत असू त्याच अवस्थेत स्तब्ध होऊन जायचं.  जो हलेल, जो स्तब्धता मोडेल, तो हरला.
सध्या कोरोनामुळे आपलं असंच काहीसं झालं आहे. आणि आपलं म्हणजे फक्त आपलंच नाही, सा:या जगाला या इटुकल्या विषाणूनं स्टॅच्यू करून टाकलं आहे. आपणही जिथे असू तसे, जसे असू तसे, असेल-नसेल त्या सामानात अडकून पडलो आहोत. कोणी बंडखोरी करून उगाच घराबाहेर पडायचा प्रयत्न केला तर पोलिसांचे दंडुके पडत आहेत. घरात बसायचं तर जीव नको झालाय. गुदमरून जातो की काय, असं वाटायला लागलं आहे. अर्थात, घरी बसणं हे आपल्याच फायद्याचं आहे. समाजात विषाणू वेगाने पसरू नये म्हणून अत्यावश्यकसुद्धा आहे. एरव्ही तर आपण म्हणत असतो, रु टीनचा कंटाळा आलाय. ब्रेक पाहिजे; परंतु जेव्हा अचानक आपल्याला असा ब्रेक मिळतो, तेव्हा तो ब्रेक आनंददायी वाटत नाही. आपल्याकडे वेळ आहे, आपण घरीच आहोत आणि तरीही आपण चिल करत नाही आहोत. आपण रिलॅक्स नाही आहोत. आपल्याला पुढे काय होईल, जगात काय सुरू आहे, कुठे किती माणसं रोज कोरोनाला बळी पडली, कुठे कोणत्या गोष्टी लोकांना मिळाल्या नाहीत, असे सगळे नाही नाही ते  विचार करून ताण येतोय. प्रश्न खूप. अनिश्चितता खूप. मात्र, नेमकं उत्तर असं काहीच नाहीये. 
त्यात स्टॅच्यू कमांड तरी जरावेळ गंमत म्हणून असते. ती आपण आनंदाने, हिरिरीने पाळतो. तेव्हा आपल्याला त्या स्टॅच्यू खेळात जिंकायची ईर्षा असते. इथे मात्र तसं नाही. इथे आला दिवस कसा ढकलायचा हे आपल्याच घरात निवांत बसून आपल्याला कळत नाहीये! जाम लोचा होऊन गेलाय, असं वाटतंय. त्यात तात्कालिक प्रश्न आहेतच. म्हणजे, कोणी भलत्याच कुणाच्या घरी अडकला आहे. कोणी रस्त्यात कुठे अडकला आहे. कोणी कामानिमित्त कु ठे  गेले आणि तिकडेच अडकले आहेत. कोणी कमीत कमी साधनसामग्री असलेल्या घरांमध्ये अडकले आहेत, जिथे जास्त साठा करून ठेवता येणार नाही. कोणी भरल्या घरात अडकले आहेत. कोणी एकटे अडकले आहेत, तर कोणी मित्र-मैत्रिणींसोबत अडकले आहेत. असंच आपल्याला एकवीस दिवस आणि त्यानंतर न जाणो किती दिवस सहन करायचं आहे, माहीत नाही. बाहेर जाऊन कोरोना घरात घेऊन यायचा नाहीये. अशावेळी एकटेपणा वाटणं, ज्यांच्यासोबत आपण अडकलो आहोत, त्यांच्याशी वादावादी होणं, जरी ते आपल्या घरातलेच लोक असतील तरी, हे सर्व सहज शक्य आहे. त्यात भूक न लागणं, सतत खा, खा होणं, केव्हाही झोप येणं आणि हवी तेव्हा ती न येणं, असं सगळं होऊ शकतं. आपले खाण्याचे आणि झोपेचे कोरोनाच्या लॉकडाउन आधीचेच नखरे असतील आणि आपण ते दुरु स्त केले नसतील तर आणखीनच कठीण होऊन जाणार. हाताशी वेळ असून काहीच करावंसं न वाटणं, इतकं काही करायचं आहे की कुठून सुरु वात करावी, तेच न कळणं आणि म्हणून बसून तर बसूनच राहाणं, हे सगळं होणार आहे. आता आहे ना वेळ तर करत बस जास्तीची कामं आणि जा फारच दमून असंही होणार आहे. 

त्यात लोकांचं त्यांच्या त्यांच्या लॉकडाउनमध्ये काय काय सुरू आहे, यावरदेखील आपला फुल्ल फोकस. ते कसं भारी काय काय करत आहेत. त्यांच्या घरात बाबा सगळं आहे. त्यांची फॅमिली कशी जणू पिक्चर परफेक्ट आहे. त्यांचे व्हिडीओ कसले भारी आहेत. आपल्याकडे मात्र असं काहीच नाही. आपली फॅमिली अशीच, आपल्या घरातला तो तसाच, हे तुलनेचे अॅण्टिनादेखील सतत सुरूच राहातात. त्या अण्टिनाची ना कधी वीज जात, ना कधी आउट ऑफ रेंज होत. समोर काहीही आलं की सुरू, त्यांचं असं आणि माझं तसंच. यामुळे असलेला एकटेपणा, आलेला कंटाळा, वाटणारं नैराश्य आणखीन वाढणारच आहे. आपण आणखीन गर्तेत लोटले जाऊ. 

म्हणूनच, एकटेपणा, ताण, निराशा, भीती, अनिश्चितता या सगळ्या गोष्टींच्या जणू टोकावर आपण उभे आहोत, हे आधी जरा वेळ का होईना समजून घेऊ. समजल्याशिवाय आपलं जे सुरू आहे, ते बरं की वाईट हे आपल्याला कळणारच नाही. एकदा हे समजून घेतलं, तर उद्या लगेच आपण त्यातून जादूची गोळी खाऊन बाहेर पडू असंदेखील होणार नाहीये. आधीच डब्बा झालेली गाडी आता नव्या आणखीन खडतर रस्त्यावर आलेली आहे, हे आपल्याला जितकं लवकर कळेल, तितकं चटकन आपण आधी ती गाडी नीट करायला घेऊ. तिला थोडं तेलपाणी करू. चाकांमध्ये हवा भरू पुरेशी. जरा फडकं मारून चकाचक करू. म्हणजे हा काय किंवा आणख वेगळा खडतर रस्त्या पुढे आला तर आपण थोडेतरी तयार असू. आपल्या हातात आता आणि तेव्हाही चालवायला बरी, दणकट गाडी असेल. कदाचित तो रस्ता कसा पार केला, ते ही आपल्याला कळणार नाही. इतके सहज आपण त्यातून बाहेर पडू. 

मग,  सुरु वात करायची? 
बघा हे करून पाहा. गाडीची सव्र्हिसिंग, ऑइलिंग करायचा वेळ मिळाला आहे तर माङयाच वाटय़ाला का अशी भंगार गाडी आली म्हणून रडत बसायचं की त्याच गाडीवर काम करून तिला एकदम रेसरेडी करायचं. तुमच्या हातात आहे. त्यासाठी. ये कर के देखो!


ट्राय दिस. वन थिंग अॅट अ टाइम!

1. लगेच कागद पेन घेऊन बसायचं. आपलं कोरोना आधीचं काय रुटीन होतं आणि एरव्ही या महिन्यात आपण काय करणार होतो, ते बुलेट पॉइंटमध्ये मांडायचं. त्यातील ज्या गोष्टी घरात अडकल्याने अजिबातच शक्य नाहीत, त्यादेखील बाजूला लिहून ठेवायच्या. हे संकट जाईल तेव्हा जाईल. जेव्हा आपण लॉकडाउनमधून बाहेर येणार आहोत तेव्हा आपली शरीर-मनाची कंडिशन आज आहे त्यापेक्षा आणखीन वाईट करून ठेवायची आहे की तेव्हा आपल्याकडे झकास सव्र्हिसिंग केलेली आपली तय्यार गाडी असणार आहे, ते नीटच ठरवून टाकायचं. 

2. एकदा हे ठरलं की आपलं रु टीन नीट फॉलो करायचं. आपला आहार, आपल्या घरात बसून करायच्या अॅक्टिव्हिटीज, आवरसावर यांचंसुद्धा प्लॅनिंग करून टाकायचं. त्यात घरातल्या लोकांशी डोक्याला डोकं लागणार, वादावादी होणार, आपल्या त्यांच्या आणि त्यांना आपल्या सवयी आवडणार नाहीत, हे सगळं गृहीतच धरून ठेवायचं. तरच त्यातून मार्ग काढता येईल. 
3. घरातल्या कामांना कोणत्या वेडय़ाने हे काम बाईचे, हे काम पुरु षांचे असे लेबल्स जोडले, असा प्रश्न तुम्हाला पडेल. हरएक कामात एक गंमत असते आणि ते नीट शिकून घेऊन उत्तम पद्धतीने करण्यात एक झकास स्ट्रेस बस्टर असतो, हे समजून घ्यायचा हाच उत्तम काळ आहे. लॉकडाउन ही शिक्षा नसून एक संधी आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. 

4. काहीजण एकेकटे राहात असतात. अशावेळी आजूबाजूला घडणा:या नकारात्मक गोष्टी आपल्या दारार्पयत येऊन धडकल्या तर काय, ही चिंता कितीही खंबीर कोणी असला/असली तरी सतावतेच. नेहमीच्या रु टीनमध्ये एकटं राहाणं, काम करणं वेगळं आणि अशा जागतिक संकटात एकटं राहाणं वेगळं, हे मान्य करून टाकायचं. सेल्फ टॉक करायचा. स्व-सूचना द्यायला अजिबात टाळायचं नाही. त्या जमेल तितक्या कसोशीने पाळायच्या.

5. एरव्ही तर आपल्या फोनमध्ये कॉण्टॅक्ट लिस्ट ओसंडून वाहत असते. तिचा उपयोग करायचा. लोकांशी वेळ काढून सहज गप्पा मारायच्या. जस्ट अ कॉल अवे, अशी खरंच कोणी माणसं आहेत का आपल्या आयुष्यात, हे ही त्यानिमित्ताने आपल्याला कळेल. एरव्ही जसं आपण अंघोळ, जेवण, झोप, स्व-स्वच्छता हे रु टीन पाळत होतो, तसंच आताही पाळायचं. दिवसभरात आपल्याला फ्रेश वाटेल अशा लहानसहान गोष्टी अगदी आवर्जून करायच्या. जसं की घर नेटकं ठेवणं. छान काही बनवून खाणं. नवीन काहीतरी करून बघणं. वेगळं काही ऐकणं, पाहणं. अशाच सर्व लहानसहान स्टेप्समधूनच आपल्याला ‘कामं घरी राहून आटोपली बाबा’, हा दिलासा मिळेल. त्यातून पुढची कामं मार्गी लावायची प्रेरणासुद्धा मिळेल. 

6. लॉकडाउन संपल्यावर आपली गाडी आधी पळत होती, त्यापेक्षा सुपरफास्ट पळेल, हेच एकमेव ध्येय सध्या ठेवायचं आहे. म्हणजेच आपण या फेजमधून तरुन जाऊ. आपलं आरोग्यदेखील आपणच टिकवू. आपला स्क्रीन टाईम, माहितीचा भडिमार कमी करून नवीन चार गोष्टी करू. एकातून एक आणखीन बरंच काही सुचत जाईल, जमून येईल. एकटेपणा, नात्यांमधली कचकच, निराशा वगैरे पळून जाईल. 
एकच लक्षात ठेवायचं, आपली शरीर-मनाची गाडी झकास हवी. ती झकास करायला छोटय़ा छोटय़ा स्टेप्स आखून कामाला लागायचं..

( प्राची पर्यावरण अभ्यासक, मानसोपचारतज्ज्ञ आणि मायक्रोबायॉलॉजीचीही तज्ज्ञ आहे.)

Web Title: coronavirus: Corona says Statue!- life changing things you can do when staying at home in corona time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.