अडचण असेल तर मोफत घ्या ! - औरंगाबादच्या भाजी विक्रेत्या तरुणाची दिलदार गोष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 03:04 PM2020-05-28T15:04:33+5:302020-05-28T18:13:58+5:30

भाजीच्या ठेल्यावरचा हा बोर्ड आणि भाजी विक्रेत्या तरुणाचा हा फोटो खूप व्हायरल झाला. ‘ऑक्सिजन’ने त्या तरुणाला शोधलं. तो राहुल. त्याचा मित्र मनीष आवटेने ती पोस्ट लिहिली होती, तो म्हणाला, सोशल मीडियात काय चाललंय मला माहितीपण नाही!’ त्याला म्हटलं तू लिहून दे, तुला का वाटलं, हा बोर्ड लावून भाजी विकावं? तर त्यानं मनोगत लिहून पाठवलं, ते त्याच्याच शब्दात.

coronavirus : Aurangabad young man Rahul Labade, vegetable vendor, giving vegetables free of cost to needy. | अडचण असेल तर मोफत घ्या ! - औरंगाबादच्या भाजी विक्रेत्या तरुणाची दिलदार गोष्ट  

अडचण असेल तर मोफत घ्या ! - औरंगाबादच्या भाजी विक्रेत्या तरुणाची दिलदार गोष्ट  

Next
ठळक मुद्देछोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?

राहुल लबडे  

घरची परिस्थिती अशी की मला खूप लवकर जॉब करावा लागला. त्यात घरात मी मोठा. जॉब करून शिक्षण सुरूहोतं.
 बाबा खूप वर्षापासून भाजीपाला विकण्याचा धंदा करतात. मी शिकलो, जॉबला पण लागलो. पण आता कोरोना संकटात माझा जॉबही गेला. 
घरी मी, माझा एक भाऊ , दोन बहिणी आणि आई-बाबा. एवढय़ा कुटुंबाचा उदरनिर्वाह बाबा एकटे भाजीपाला विकून करत होते. 
मीही ठरवलं त्यांना मदत करायची. मी ही त्यांच्यासोबत भाजीपाला विकू लागलो. भाजीची गाडी लावली.
मनात तर फार होतं वेगळं काहीतरी करु. तशी जिद्द होती. पण तशी परिस्थिती कधी निर्माणच झाली नाही. 
मलापण माहितीये की परिस्थिती मनासारखी निर्माण होत नाही ती निर्माण करावी लागते. 
मात्र सध्या परिस्थितीत मी भाजीची गाडी लावून काम करत होतं.
लॉकडाउनमध्ये एक दिवस, एक आजी चौकात काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
पण त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. 
मी जवळ जाऊन आजीला त्यांची अडचण विचारली. ती आजी भराभरा सांगायला लागली, ‘मला नंदनवन कॉलनीमधे जायचं आहे.  तिथे मी एका घरी काम केलं आहे. त्या कामाचे माझे  50 रूपये त्यांच्याकडे आहे. मला ते आणायला जायचं आहे.  गाडी नाही, मला कोण तिथं सोडणार, मला चालवत पण नाही.  पन्नास रुपयात माझा भाजीपाला तरी येईल. घरात काहीच नाही. सामान पण आणायचे आहे. आता  फक्त 51 रूपये आहेत.’ 
आजीच्या भुकेल्या पोटासाठी ते कुठं अडकलेले 50 रुपये पन्नास हजारासारखे होते. मी मनात विचार केला. फक्त 50 रुपयात आजी हे सगळं कसं करणार ?  मी आजीला म्हटलं तुला हवा तो भाजीपाला घे. आजी खूप खूष झाल्या. खरं सांगतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सुख पाहून मला जितकं सुख वाटलं,
तेवढं कधी वाटलं नव्हतं.  त्यान आजीनं मला पाच रूपये दिले. डोक्यावर हात ठेवलं नी  म्हणाल्या ,  ‘मला पाच रुपयात हे सगळं कुणीच दिलं नसतं. मी कधीतरी राहिलेले पैसे तुला नक्की आणून देईल!’ माझ्या  डोक्यावर हात ठेवून आजी निघून गेल्या.
असे खूप मोलमजुरी करणारे कुटुंब आहेत, जे रोज कमावतात आणि रोज खातात. मी ही त्याच गरीब गरजू समाजातला आहे. मला वाटलं, आपल्याला जे जमेल तेवढं आपण केलं तर?
मी  ठरवलं अडचणीत असणाऱ्याना मोफत भाजी द्यायची.  एक उपाशी पोटच दुसऱ्याची भूक समजू शकतं.
मी म्हणून गाडीवर पाटी लावली की अडचणीत असाल तर  मोफ त घ्या, भाजी.
ज्यांच्याकडे पैसे होते त्यातल्या काहींनी तर मला भाजीचे कधी जास्त पैसेही दिले, ती पाटी पाहून.
ज्यांच्याकडे नव्हते, त्यांनी थोडीच भाजी मोफत घेतली, पोटापुरती.
मला नाही वाटत की, मी हे गरजूंना  ‘दान’ म्हणून काही दिलं, हा त्यांच्या कष्टाचा  ‘वाटा’ आहे, या भावनेनं वाटलं म्हणून घ्या म्हणालो, एवढंच.
 देश मजुरांच्या पायावर उभा आहे. हा पाया उपाशी राहिला तर देश कमजोर नाही का होणार?
मग या छोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?

 

Web Title: coronavirus : Aurangabad young man Rahul Labade, vegetable vendor, giving vegetables free of cost to needy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.