मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:29 PM2019-09-15T18:29:13+5:302019-09-15T18:29:53+5:30

म्हामल कुटुंबीयांची बुद्धिबळात झेप : अरविंद यांच्याकडून फिडेचा ‘आयए’ नॉर्म पूर्ण 

The son is the grandmaster and the father is the international arbiter! | मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर!

मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर!

Next

सचिन कोरडे, पणजी : घरात बुद्धिबळाचे वातावरण. त्याचा फायदा मुलाला झाला. मुलाने वडिलांकडून प्रोत्साहन घेत बुद्धिबळाच्या चाली शिकल्या. पुढे त्याने स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला. पाहता पाहता तो गोव्यातील पहिला ग्रॅण्डमास्टर बनला. आता त्याच मुलाच्या म्हणजे अनुराग म्हामल याच्या वडिलांनीही बुद्धिबळात झेप घेतलीय. फरक एवढाच की, त्यांची ही कामगिरी पटाबाहेरची आहे. राज्याचे आघाडीचे आर्बिटर असलेले अरविंद आता आंतरराष्ट्रीय आर्बिटर बनले आहेत. अशी कामगिरी करणारे ते एकमेव गोमंतकीय आहेत, हे विशेष.
अरविंद यांना बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या ‘फिडे’कडून हा मान प्राप्त झालाय. त्यांना ७ ते ८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या स्पर्धेवेळी हा गौरव प्रदान करण्यात आला. अरविंद यांनी आपला नॉर्म २०१५ मध्ये राष्ट्रीय टीम चॅम्पियनशीप, पहिली गोवा आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धा २०१८, मुंबई येथील १२ वी मेयर्स आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आणि दुसºया गोवा आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पूर्ण केला.
अरविंद यांनी एक बुद्धिबळपटू म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. ते राज्यातील विविध स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य भाग होते. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात प्रमुख भूमिका घेतली आहे. या स्पर्धांत त्यांनी आर्बिटर म्हणून दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. अरविंद हे बांबोळी चेस क्लबचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच ते गोवा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव सुद्धा होते. सध्या ते तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आर्बिटर म्हणून सुरुवात केल्यानंतर त्यांना फिडे आर्बिटरचा मान प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी फिडेचा सर्वाेच्च मान असलेला आंतरराष्ट्रीय आर्बिटर हा किताब मिळवला आहे. 
दरम्यान, अरविंद यांच्या कामगिरीबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर, महेश कांदोळकर, दत्ताराम पिंगे, संजय बेलूरकर यांनी अभिनंदन केले. 
"मी जवळपास ३० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आर्बिटर म्हणून काम केले. गेल्या दोन वर्षांपासून प्रमुख आर्बिटर म्हणून काम पाहत होतो. एक आवड आणि छंद असल्याने मी बुद्धिबळापासून दूर जाऊ शकलो नाही. आंतराष्ट्रीय आर्बिटर बनता येईल, असे मित्रांकडून सांगण्यात येत होते. तसा प्रयत्न केला आणि यश मिळाले. हा किताब मिळाल्याबद्दल मला समाधान वाटते. आता राज्यातील आर्बिटरची संख्या वाढावी अशी इच्छा आहे. त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीन,"असे अरविंद म्हामल यांनी सांगितले.

Web Title: The son is the grandmaster and the father is the international arbiter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.