हॅट्ट्रिकसह सायना उपांत्य फेरीत

By Admin | Updated: December 20, 2014 02:19 IST2014-12-20T02:19:45+5:302014-12-20T02:19:45+5:30

भारताची सुपर स्टार बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या काट्याच्या लढतीत कोरियाच्या जू बेई यिओन

Saina in the semi-finals with hat-trick | हॅट्ट्रिकसह सायना उपांत्य फेरीत

हॅट्ट्रिकसह सायना उपांत्य फेरीत

दुबई : भारताची सुपर स्टार बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या काट्याच्या लढतीत कोरियाच्या जू बेई यिओन हिचा १५-२१, २१-७, २१-१७ असा पराभव करताना ‘अ’ गटात विजयाच्या हॅट्ट्रिकसह वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्सच्या उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली.
सायनाने ही लढत एक तास सहा मिनिटांत जिंकली. पहिला गेम गमाविल्यानंतर सायनाने जबरदस्त मुसंडी मारताना विजय मिळविला. सायनाने तिच्या गटातील पहिल्या लढतीत द्वितीय मानांकित चीनच्या शिजियान वाँग आणि नंतर दुसऱ्या सामन्यात सूं जी हियून यांचे आव्हान मोडीत काढले होते.
पहिला गेम गमाविल्यानंतर सायनाने या सामन्यात सनसनाटी निकाल लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे सायना पहिल्या गेममध्ये एकवेळ ८-२ अशी आघाडीवर होती; परंतु कोरियन खेळाडूने १४-१४ अशी बरोबरी साधल्यानंतर सलग गुण घेताना पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसरा गेमही चुरशीचा ठरला. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी ६-६ अशी बरोबरी साधली होती; परंतु त्यानंतर सायनाने मुसंडी मारताना सलग नऊ गुण आणि नंतर पुन्हा सलग सहा गुण घेत हा गेम २१-७ असा सहज जिंकला.
निर्णायक गेममध्ये कोरियन खेळाडूने सुरुवातीला आघाडी घेतली आणि पुन्हा या दोन खेळाडूंत १३-१३ अशी बरोबरी साधली; परंतु सायनाने पुन्हा एकदा मुसंडी मारत सलग पाच गुण घेऊन गुणसंख्या १७-१३ अशी केली. कोरियन खेळाडूने मुसंडी मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु सायनाने हा गेम २१-१७ असा जिंकताना उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina in the semi-finals with hat-trick