पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:14 IST2025-07-03T18:14:20+5:302025-07-03T18:14:48+5:30
पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
India-Pakistan Hockey Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्या घटनेनंत भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, सीमा बंद करणे आणि पाक नागरिकांना परत पाठवण्यासारखे मोठे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानीहॉकी संघाला भारतात खेळण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपसाठी पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येईल. क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने गुरुवारी ही माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रीडा मंत्रालयाने म्हटले की, आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतात खेळणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात नाही, परंतु द्विपक्षीय (फक्त भारत आणि पाकिस्तानमधील) सामने हा वेगळा विषय आहे. म्हणजेच, आता पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल. आशिया कप हॉकी स्पर्धा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळली जाईल.
दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधांमुळे आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, आता पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. आशिया कप व्यतिरिक्त, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर विश्वचषकातही पाकिस्तानच्या संघाला खेळण्याची परवानगी दिली जाईल. हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंह यांनी पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आम्ही सरकारच्या सूचनांनुसार काम करू. सरकार जे काही निर्णय घेईल, ते आमचे मत असेल.
टी-२० आशिया कपचे काय होणार?
हॉकीसोबतच या वर्षी भारतात क्रिकेटचा टी-२० आशिया कप आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाला परवानगी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. परवानगी मिळाली नाही, तर भारत आणि पाकिस्तानमधील सामना यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम वेळापत्रक आणि ठिकाण लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाईल.