'मोदीजी आंबा खाता का म्हणे, काय मजाक लावलाय का देशाचा?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:29 IST2019-04-25T21:28:20+5:302019-04-25T21:29:25+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे.

'मोदीजी आंबा खाता का म्हणे, काय मजाक लावलाय का देशाचा?'
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवरुन राज यांनी मोदींना लक्ष्य केले. देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारतोय आपण, काय प्रश्न विचारावेत हेही कळत नाही. मोदीजी, तुम्ही आंबा कसा खाता? हा प्रश्न विचारतात का पंतप्रधानांना? असे म्हणत राज यांनी मोदींच्या मुलाखतीचा खरपूस समाचार घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. आजच्या सभेतही राज यांनी विकास, बँकांची फसवणूक, निरव मोदी, मल्ल्या, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, रोजगार आणि भाजपाच्या आयटीसेलवरुन भाजपाला लक्ष्य केले.
''ते अक्षय कुमार काल पंतप्रधानांची मुलाखत घेत होते, आमच्या पंतप्रधानांना काय लोडेड प्रश्न विचारत होते. आजपर्यंत देशातील कुठल्याही पत्रकाराची हिंमत नसेल, झाली असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का? काय, आमच्या पंतप्रधानांना प्रश्न काय विचारलाय, कमाल प्रश्नय. चोखून खाता का कापून खाता... काय मजाक लावलाय? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालूय, असे म्हणत राज ठाकरेंनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीवरुनही मोदींना लक्ष्य केले.
तसेच पंतप्रधानांनी जे गाव दत्तक घेतलं तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचं पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचं पाणी वाहतंय, गावात रोगराई पसरली आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं गाव सुधारू शकलं नाही ते देश काय सुधारणार, अशा शब्दांत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दरम्यान, नाशिकमधील सभेत बुफे घेऊन येणार असल्याचंही राज यांनी म्हटलं.