नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 07:31 AM2021-04-17T07:31:37+5:302021-04-17T07:31:52+5:30

Navi Mumbai :कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत.

Time of starvation on Naka workers, waiting for work as there is no food particle in the house | नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा

नाका कामगारांवर उपासमारीची वेळ, घरात अन्नाचा कण नसल्याने कामाची प्रतीक्षा

Next

नवी मुंबई : पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन महिन्यांपूर्वी आलेल्या नाका कामगारांनी नवी मुंबईतील नाके पुन्हा गजबजले होते. परंतु आता १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठेकेदारांची दैनंदिन कामे ठप्प झाल्याने अनेक नाका कामगारांनी गावची वाट धरली आहे. मात्र, ज्यांना गावी जाण्यासाठी तिकिटाला पैसेही नाहीत, अशा नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत. ठेकेदारांना कामासाठी २० ते २५ मजूर लागतात. मात्र अनेक जणांनी गावचा रस्ता धरल्याने उर्वरित कामगार नाक्यावर कामाच्या शोधात दिवसभर बसून असतात. किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी  तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ एलपी, घणसोली, नोसिल नाका, ऐरोली सेक्टर ३ या नाक्यांवर मजूर मिळेनासे झाले आहेत. जे आहेत ते एक-दोन तासांच्या छोट्या कामासाठी येत नाहीत. संपूर्ण दिवसाच्या आठ तासांच्या कामाची मजुरी ६०० ते ७०० रुपये घेतली जाते. महिला बिगारी ५०० ते ५५० रुपये, गवंडी (कडिया)ची मजुरी १००० ते १२०० रुपये असून लादी बसविणारा कारागीर १२०० ते १५०० ब्रास १०० चौ. फुटासाठी घेतो.


पूर्वीसारखी मोठी कामे हल्ली मिळत नाहीत. दोन-चार दिवसांच्या कामानंतर पुन्हा नवे काम शोधावे लागते. त्यात कंत्राटदारांकडेही पुरेसे काम नाही. प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत असल्याने लोक घराचे बांधकाम, रंगरंगोटी, सुशोभीकरण टाळत होते. त्यामुळे मजुरांना काम मिळेनासे झाले.
- आनंद परमेश्वर, 
बांधकाम ठेकेदार, साठेनगर, रबाले

तीन-चार दिवसांपूर्वी नाका कामगारांची गर्दी असायची. आता प्रत्येक नाक्यावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी दोन-चार मजूर उभे असतात. आम्हालाही पैशांची गरज असल्याने छोट्या-मोठ्या कामावर दिवस ढकलण्यापेक्षा जास्त मजुरी मिळेल तीच कामे स्वीकारतो. परंतु दोन दिवसांपासून कामे मिळत नसल्याने आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- वसंत पिठोले, 
नाका कामगार, 
त्र्यंबकेश्वर

Web Title: Time of starvation on Naka workers, waiting for work as there is no food particle in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.