नवी मुंबई विमानतळाची प्रवासी संख्या चार लाखांच्या उंबरठ्यावर; मेपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 07:22 IST2026-04-30T07:19:59+5:302026-04-30T07:22:02+5:30
प्रारंभी दररोज सुमारे ३० ते ३५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. विमातळावरील एकूण प्रवासी संख्या ३ लाख ९३ हजार वर पोहोचली आहे

नवी मुंबई विमानतळाची प्रवासी संख्या चार लाखांच्या उंबरठ्यावर; मेपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा
कमलाकर कांबळे
नवी मुंबई - देशांतर्गत विमान सेवांना मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय सेवांसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे या विमानतळाची आतापर्यंतची एकूण प्रवासी संख्या ३ लाख ९३ हजार ८१९ वर पोहोचली आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत उड्डाणांच्या जोरावरच विमानतळावरून दररोज सुमारे ५ हजार प्रवाशांची हाताळणी केली जात होती. आता दररोज सरासरी २० ते २२ हजारांपर्यंत पोहोचली. मे २०२६ पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याचे संकेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रारंभी दररोज सुमारे ३० ते ३५ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. विमातळावरील एकूण प्रवासी संख्या ३ लाख ९३ हजार वर पोहोचली आहे, असेही स्पष्ट केले.
दुसरी धावपट्टी आणि दुसरे टर्मिनल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तिसऱ्या धावपट्टीचे नियोजनही हाती घेण्यात आले आहे. तिसऱ्या धावपट्टीमुळे विमानतळाची अंतिम वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे १३ कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता मार्गच अद्याप सोयीचा
कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अजून काही आव्हाने कायम आहेत. सध्या रस्ते मार्गावरच मुख्य अवलंबित्व आहे. अटल सेतूमुळे मुंबईकडून प्रवास सुलभ झाला असला, तरी उपनगरी रेल्वे, मेट्रो आणि मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हबची कामे प्रगतिपथावर आहेत. पण, सार्वजनिक वाहतुकीचे मर्यादित पर्याय, वाहतूक कोंडी आणि वाढलेले टॅक्सी दर यामुळे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोणती शहरे जोडली ?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवरून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, इंदूर, नागपूर, लखनौ, जयपूर, चंडीगड, कोलकाता, भुवनेश्वर, पटना तसेच गोवा, कोची, तिरुवनंतपुरम या शहरांसाठी उड्डाणे सुरू आहेत. दररोज सुमारे १५० उड्डाणे आणि आठवड्याला सुमारे ११०० उड्डाणे होत आहेत.