बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:53 PM2019-11-20T23:53:54+5:302019-11-20T23:53:56+5:30

नेरळमधील प्रवासी, चालकांचे हाल; रिक्षा संघटना आंदोलन करणार

Direction of a road leading to a bus stop | बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना

बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना

Next

- कांता हाबळे

नेरळ : कर्जत एसटी आगाराचे महत्त्वाचे एसटी स्थानक असलेल्या नेरळ एसटी स्थानकात जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर केवळ माती शिल्लक उरली असून, त्यामुळे धुळीचे लोट रस्त्यावरून चालताना प्रवाशांच्या तोंडावर उडत आहेत. दरम्यान, नेरळ एसटी स्थानक, नेरळ सरकारी दवाखाना आणि नेरळ रेल्वे स्थानक या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी याच मार्गावरून जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सरकारी यंत्रणांकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्थानिक रिक्षा संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

नेरळ एसटी स्थानक, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेरळ रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरून एसटी थांब्याकडे जाणाºया रस्त्याचा वापर करतात. या ५०० मीटर लांबीच्या रस्त्यावर मागील १३ वर्षांत एकदाही डांबर टाकण्यात आलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या रस्त्यावर पूर्वी सुरक्षा भिंती आणि लहान साकव पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर किमान पाच वर्षांनी डांबरीकरण होणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे शासकीय यंत्रणेचे दर वेळी दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत, नूतनीकरणाबाबत नेरळ एसटी स्टॅण्ड येथे प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षा संघटना आवाज उठवत आहेत; पण लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे.
४५०-५०० मीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरणाची गरज आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे प्रवासी तसेच चालकांनाही त्रास सहन करावा लागतो.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानात मातीचे थर साचलेले दिसून येत असून, व्यापारीही रोजच्या साफसफाईला कंटाळले आहेत. नेरळ गाव ते कळंबकडे जाणाºया रस्त्याने नेरळ एसटी थांब्याकडे येताना पुढे याच रस्त्यावरून नेरळ रेल्वे स्थानकात जाता येते. स्थानकात पोहोचण्यासाठी या रस्त्याचा वापर दररोज किमान ५००० हून अधिक प्रवासी करीत असतात, तर सरकारी दवाखान्यात दररोज शेकडो रुग्ण येत असतात. खड्डेमय रस्त्यामुळे सर्वांनाच कसरत करावी लागते.

रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाºयांना आरोग्याच्या व्याधी जडत आहेत. रिक्षाचालक संघटनांनी, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नेरळ-कळंब रस्ता रोखून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आम्ही दोन वेळा रस्त्यासाठी आंदोलने केली आहेत; पण केवळ आश्वासने मिळाली आहेत, त्यामुळे आता यापुढे होणारे आंदोलन हे आरपारचे असेल, संबंधित अधिकाºयांनी रस्त्याच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- विजय हजारे, अध्यक्ष, रिक्षा संघटना

नेरळ एसटी स्थानकाकडे जाणाºया रस्त्यासाठी, नेरळ विकास प्राधिकरणाकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसा प्रस्ताव सादर असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
- एस. गोपणे, प्रभारी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

Web Title: Direction of a road leading to a bus stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.