Coronavirus : एपीएमसीत २० तास स्वच्छता मोहीम,भाजीसह फळ मार्केट स्वच्छतेसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:23 AM2020-03-20T04:23:25+5:302020-03-20T04:24:38+5:30

सलग २० तास स्वच्छतेचे काम सुरू होते. कचरा उचलून पॅसेज धुण्यात आले. कीटकनाशक औषधे फवारून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

Coronavirus: 20 hours cleanliness campaign in APMC, fruit market with vegetables closed for sanitation | Coronavirus : एपीएमसीत २० तास स्वच्छता मोहीम,भाजीसह फळ मार्केट स्वच्छतेसाठी बंद

Coronavirus : एपीएमसीत २० तास स्वच्छता मोहीम,भाजीसह फळ मार्केट स्वच्छतेसाठी बंद

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट विशेष स्वच्छतेसाठी गुरुवारी बंद ठेवण्यात आले. सलग २० तास स्वच्छतेचे काम सुरू होते. कचरा उचलून पॅसेज धुण्यात आले. कीटकनाशक औषधे फवारून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्या प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.

नवी मुंबईमध्ये ७२ हेक्टर जमिनीवर बाजार समितीने पाच मार्केट उभारली आहेत. मार्केटमधून प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो. यामधील ८० टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने पाचही मार्केटमध्ये उपाययोजना सुरू केल्या असून भाजी व फळ मार्केट गुरुवारी व रविवारी पूर्णपणे बंद करून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. मार्केटमधील ट्रक, टेम्पो व इतर वाहने बाहेर काढण्यात आली. पहाटेपर्यंत सर्व कचरा साफ करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. कचरा साफ केल्यानंतर रस्ते व दोन्ही गाळ्यांच्या मधील पॅसेज पाण्याने धुऊन घेण्यात आला. पाणी मारून धूळही साफ करण्यात आली. मार्केट धुतल्यानंतर रस्ते, गटार व गाळ्यांच्या परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली. ज्या ठिकाणी ओला कचरा साठतो त्या ठिकाणी कीटकनाशक पावडर टाकण्यात आले. मार्केटमध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठीही धुरीकरण व औषधांची फवारणी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास २० तास ही मोहीम सुरू होती.

बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट १९९६ मध्ये स्थलांतर करण्यात आले. मार्केटच्या साफसफाईसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून नियमित कचरा उचलण्यात येतो. परंतु २४ वर्षांमध्ये प्रथमच विशेष स्वच्छता मोहीम राबवून मार्केट धुऊन घेण्यात आले आहे. कचरामुक्त मार्केट करून औषध फवारणी करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेसाठी मार्केट बंद ठेवण्यासही व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली होती. मार्केटमधील हॉटेल व इतर स्टॉल्सही बंद ठेवण्यात आले होते. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले होते.

प्रवेशद्वारावरच
स्वच्छतेची सुविधा
बाजार समितीच्या प्रत्येक मार्केटमध्ये यापुढे एकच आवक गेट ठेवण्यात येणार आहे. मार्केटमध्ये येणाºया वाहनचालकांना गेटवरच हात धुण्यासाठीची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून मार्केटमध्ये गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फळ मार्केटमध्ये रात्री दहा वाजल्यापासूनच कचरा उचलण्यास सुरुवात केली. रात्रभर कचरा साफ करून सकाळी पॅसेज धुऊन घेतले. सायंकाळपर्यंत औषध फवारणी करून मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यापुढेही मार्केट नियमित स्वच्छ राहील याकडे लक्ष दिले जाईल.
- संजय पानसरे,
संचालक फळ मार्केट

भाजी मार्केटमध्ये देशभरातून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. ओला कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत असतो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गुरुवारी व रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये रात्रीपासून साफसफाई, औषध फवारणी करण्यात आली.
- शंकर पिंगळे,
संचालक, भाजी मार्केट

औषध फवारणी
पहाटेपर्यंत सर्व कचरा साफ करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. कचरा साफ केल्यानंतर रस्ते व दोन्ही गाळ्यांच्या मधील पॅसेज धुऊन घेण्यात आला.
पाणी मारून धूळही साफ करण्यात आली. मार्केट धुतल्यानंतर रस्ते, गटार व गाळ्यांच्या परिसरामध्ये औषध फवारणी, किटकनाशक फवारणी करण्यात आली.

Web Title: Coronavirus: 20 hours cleanliness campaign in APMC, fruit market with vegetables closed for sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.