रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:46 IST2026-02-05T15:45:45+5:302026-02-05T15:46:30+5:30
‘140 कोटी भारतीयांचे हित सर्वोच्च’; रशियन तेल खरेदीवर सरकारची स्पष्टोक्ती

रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका
India-Russia Oil Import: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका दाव्यानंतर भारताच्या तेल खरेदी धोरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. भारतानेरशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घेण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, 140 कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षा हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी रशिया, अमेरिका, व्हेनेझुएला यांसह सर्व पर्याय खुले ठेवले जातील.
Weekly Media Briefing by the Official Spokesperson (February 05, 2026)
— Randhir Jaiswal (@MEAIndia) February 5, 2026
https://t.co/myzGxbFjSJ
व्हेनेझुएला भारताचा जुना ऊर्जा भागीदार
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला हा भारताचा पारंपरिक ऊर्जा भागीदार राहिला आहे. 2019-20 पर्यंत तिथे निर्बंध लागू होण्यापूर्वी, व्हेनेझुएला भारतासाठी कच्च्या तेलाचा एक मोठा स्रोत होता. नंतर निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आल्यावर 2023-24 मध्ये पुन्हा तेल खरेदी सुरू झाली, मात्र निर्बंध पुन्हा लागू झाल्याने ती प्रक्रिया थांबवावी लागली. मंत्रालयाने स्पष्ट केले की, दर परवडणारे असतील आणि पुरवठ्यात अडथळे नसतील, तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीचा पर्याय भारत विचारात घेण्यास तयार आहे.
ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
सरकारच्या भूमिकेचा केंद्रबिंदू म्हणजे सामान्य भारतीय नागरिकांचे हित. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होऊ नये, इंधन दर नियंत्रणात राहावेत यासाठी सरकार एका देशावर अवलंबून न राहता विविध देशांकडून तेल खरेदीची रणनीती अवलंबत आहे. भारताची ऊर्जा धोरणे बाजारातील परिस्थिती, किंमत आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन ठरवली जातील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
रशियाची प्रतिक्रिया: भारत स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम
या संपूर्ण प्रकरणावर रशियाने संयमित आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की, भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारत हा संप्रभु देश असून, तो आपल्या गरजेनुसार कुठूनही तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे. पेस्कोव यांनी हेही अधोरेखित केले की, रशिया कधीही भारताचा एकमेव तेल पुरवठादार राहिलेला नाही. भारताने जर आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणली, तर तो निर्णय रशियाविरोधी पाऊल मानता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.