सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 21:57 IST2025-11-17T21:56:24+5:302025-11-17T21:57:35+5:30
Saudi Arabia Bus Fire : या कुटुंबातील एक सदस् मोहम्मद असलम रडत म्हणतात,"आमचे १८ लोक… सर्वकाही नष्ट झाले. आम्ही सरकारकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत, जे जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा मिळायला हवी."

सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्व जण उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ते मक्केहून मदीनेकडे चालले होते. याच वेळी त्यांची बस डिझेल टँकरला धडकली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. क्षणात तीन पिढ्यांतील लोकांचा अंत झाला.
एकाच कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू -
हैदराबादच्या मुसीराबाद येथील शेख नसरुद्दीन आणि त्यांची पत्नी अख्तर बेगमही या बसमध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, दोन मुली, सून आणि कुटुंबातील इतर सदस्यही होते. नातलग सांगतात, ते या यात्रेसाठी आठवड्याभरापासून तयारी करत होते. अत्यंत आनंदात होते. आज त्याच घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या कुटुंबातील एक सदस् मोहम्मद असलम रडत म्हणतात,"आमचे १८ लोक… सर्वकाही नष्ट झाले. आम्ही सरकारकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत, जे जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा मिळायला हवी."

या दुर्घटनेत आणखी एक कुटुंब उद्धवस्त झाले आहे, यात साबिहा बेगम, त्यांचा मुलगा इरफान, सून हुमैरा आणि त्यांचे दोन लहान मुले हामदान आणि इजान, यांचा समावेश आहे. नातेवाईक सांगतात की, “मुले पहिल्यांदाच उमराहसाठी गेली होती.”
दरम्यान, तेलंगणा राज्य हज समितीचे अध्यक्ष गुलाम अफजल बियाबानी यांनी, खाजगी ऑपरेटरवर आपले नियंत्रण नाही. मात्र, पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.