ताग उद्योगातील संकटाचे यंदा निवडणुकीवर सावट; भाजपला दिसते आहे विजयाची नवी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:17 IST2026-04-29T11:16:37+5:302026-04-29T11:17:09+5:30
बेरकपूरचे माजी खासदार असलेले अर्जुनसिंह यावेळी नोआपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत तृणमूलचे त्रिनांकूर भट्टाचार्य यांच्याशी होत आहे.

ताग उद्योगातील संकटाचे यंदा निवडणुकीवर सावट; भाजपला दिसते आहे विजयाची नवी संधी
कोलकाता - पश्चिम बंगालमधील उत्तर-२४ परगणा जिल्ह्याच्या ताग उद्योगाचे केंद्र असलेल्या या भागात सध्या असलेले औद्योगिक संकट व ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती हे मुद्दे अत्यंत संवेदनशील ठरले आहेत. विशेषत: नोआपारा, भाटपारा आणि बेरकपूर या विविध संस्कृतींच्या लोकांचे वास्तव्य असलेल्या विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक अजेंड्यावर या मुद्द्यांचा प्रचंड प्रभाव आहे. अशा य संवेदनशील भागात भाजप-तृणमूल काँग्रेस यांच्यात प्रचंड चुरस आहे.
या भागात भाजप नेते अर्जुनसिंह व त्यांचे एकेकाळचे सहकारी व आता प्रतिस्पर्धी असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार पार्थ भौमिक यांच्यातील राजकीय वैमनस्य स्पष्टपणे जाणवत आहे. बेरकपूरचे माजी खासदार असलेले अर्जुनसिंह यावेळी नोआपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत तृणमूलचे त्रिनांकूर भट्टाचार्य यांच्याशी होत आहे.
चकमकींमुळे कुप्रसिद्ध
मध्ययुगीन आणि पुरातन काळात संस्कृत अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाणारे भाटपारा हे शहर आता राजकीय वर्चस्वासाठी होणारे संघर्ष आणि जीवघेण्या चकमकींमुळे कुप्रसिद्ध आहे.
भाजपला संधीची आस
या भागातील एकूण राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता यंदाच्या निवडणुकीत भाजपला एक मोठी संधी दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या कडक देखरेखीखाली होणाऱ्या मुक्त व निष्पक्ष निवडणुका यंदा या मतदारसंघात आपला विजय निश्चित करतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.