दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 20:47 IST2025-10-18T20:45:18+5:302025-10-18T20:47:46+5:30
ऐन दिवाळीतच एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. एका भरधाव थार गाडीने दुचाकीला धडक दिली आणि पती-पत्नीसह दोन मुलांचा जीव गेला.

दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना एका भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाचा जीव गेला. शनिवारी झालेल्या थार-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी आणि दोन मुले ठार झाले. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात ही घटना घडली. नदबई-जनूथर मार्गावर थार गाडीने दुचाकीला उडवले. या घटनेनंतर संतप्त लोकांनी थार कारला आग लावत जाळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय नटवर सिंह, त्यांची २८ वर्षीय पत्नी पूजा देवी, चार वर्षांची मुलगी परी आणि दोन वर्षांचा मुलगा दीपक यांच्यासह दिवाळी साजरी करण्यासाठी सासरी जात होते.
भरतपूर जिल्ह्यातील नदबई-जनूथर मार्गावरून दुचाकीने जात असताना लुहासा गावाजवळ त्यांचा अपघात झाला. वेगात असलेल्या थार गाडीने त्यांच्या दुचाकीला उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला.
चौघांचाही जागेवरच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे आले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू आधीच झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी झाली. संतप्त झालेल्या लोकांनी धडक देणाऱ्या थार कारला आग लावली. यात कार जळून कोळसा झाली.
लुहासा येथील थार गाडीचा चालक नरेश कुमार हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. नटवर सिंह हे आपल्या कुटुंबांसह दिवाळी साजरी करण्यासाठी निघाले होते. पण, एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचा काळाने घास घेतला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.