आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:11 IST2025-11-22T19:09:59+5:302025-11-22T19:11:04+5:30
AIMIM Asaduddin Owaisi: बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात NDA चे सरकार स्थापन झाले आहे.

आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
AIMIM Asaduddin Owaisi: बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वात NDA चे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता, एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यासाठी त्यांनी सीमांचल प्रदेशाला न्याय मिळण्याची अट घातली आहे.
काय म्हणाले
ओवैसी म्हणाले की, आम्ही नितीश कुमार यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत. पण, विकास फक्त पाटणा आणि राजगीरपुरता मर्यादित राहता कामा नये. सीमांचलला न्याय मिळणे आवश्यक आहे. सीमांचल भागात पलायन, भ्रष्टाचार आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही गंभीर समस्या असून याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
VIDEO | Bihar: Addressing a gathering in Amour, AIMIM Chief Asaduddin Owaisi (@asadowaisi) said, “We will open the party office for all our five MLAs, and they will sit in that office and interact with people, twice every week. We will try to start this work within six months. I… pic.twitter.com/1vN33gN7WW
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2025
यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील निवडून आलेल्या पाचही आमदारांवर कठोर देखरेख ठेवण्याचेही संकेत दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाचही आमदार आठवड्यात दोन दिवस आपल्या कार्यालयात बसतील आणि आपली लाइव लोकेशन माझ्यासोबत शेअर करतील. तसेच, ते स्वतः दर सहा महिन्यांनी सीमांचलचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सीमांचलमध्ये पक्षाची मजबूत पकड
या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने सीमांचलमधील पाच जागांवर विजय मिळवला आहे. मुस्लिम मतदारसंख्या जास्त असलेल्या या भागात कोसी नदीच्या पुरामुळे दरवर्षी मोठे नुकसान होते. ग्रामीण लोकसंख्या प्रबळ असलेल्या या प्रदेशात पक्षाचा प्रभाव वाढत असून, सलग दुसऱ्यांदा एआयएमआयएमला येथील जनतेचा ठोस पाठिंबा मिळाला आहे. 2020 साली देखील एआयएमआयएमने सीमांचलमधील पाच जागा जिंकल्या होत्या, परंतु त्यातील चार आमदार नंतर आरजेडीत दाखल झाले होते.