एक भरधाव स्कॉर्पियो गाडी चालकाचं नियंत्रण सुटून रस्ता सोडून थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील संकल्प वाटिका येथे घडली आहे. या ,स्कॉर्पियोच्या डॅशबोर्डवर बियरच्या बाटल्या ठेवलेल्या दिसून आल्या. तसेच या गाडीवर भाजपा ब्लॉक प्रमुखाचा स्टिकर आणि उत्तराखंडची नंबर प्लेट लावलेली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या स्कॉर्पियोमधून प्रवास करत असलेले तरुण तरुणी हे मद्यधुंद होते. तसेच त्यांची गाडी भरधाव वेगात जात होती. दरम्यान, ही गाडी नियंत्रण सुटून थेट घरात घुसली. त्यामुळे घरातील दोन रहिवासी गंभीर जखमी झाले. स्कॉर्पियोमधील एक व्यक्तीसुद्धा जखमी झाली. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्कॉर्पियोमधील दोन तरुण आणि एक तरुणी घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ही स्कॉर्पियो रस्तावरून बाहेर येत खाली असलेल्या घरामध्ये घुसताना दिसत आहे. दरम्यान, गाडीच्या डॅशबोर्डवरही बियरच्या बाटल्या स्पष्टपणे दिसत आहेत.