100 आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री बना; अखिलेश यादव यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:28 IST2026-02-22T16:27:09+5:302026-02-22T16:28:16+5:30

UP News : अखिलेश यादव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

UP News: Bring 100 MLAs and become Chief Minister; Akhilesh Yadav's open offer to both Deputy Chief Ministers | 100 आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री बना; अखिलेश यादव यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर

100 आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री बना; अखिलेश यादव यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर

UP News : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले. त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक या दोघांनाही थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. दोघांपैकी कोणीही 100 आमदार घेऊन या आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हा. यापेक्षा चांगली ऑफर कुठेच मिळणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.

केशव मौर्यांना पुन्हा ऑफर 

अखिलेश यादव म्हणाले, आम्ही याआधीही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. चला, आज पुन्हा एकदा देतो. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनाही ही ऑफर दिली. यापूर्वी अनेकदा केशव मौर्य यांना लक्ष्य करत केलेल्या विधानांमध्ये यंदा ब्रजेश पाठक यांचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या ऑफरवर दोन्ही उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शंकराचार्य प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल

अखिलेश यादव यांनी शंकराचार्य प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शंकराचार्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे, त्याचे उत्तर जनता देईल. ज्यावेळी त्यांचा अपमान केला जात होता, तेव्हा हे सत्ताधारी कुठे होते? सनातन परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आमच्या परंपरेत कधीही कोणत्याही शंकराचार्यांना गंगास्नानापासून रोखले गेले नाही. असे पहिल्यांदाच घडले आहे.

20 वर्षांपूर्वीच्या घटनेचा उल्लेख; रामभद्राचार्यांवर अप्रत्यक्ष टीका

अखिलेश यादव यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वीच्या घटनेचा उल्लेख करत शंकराचार्यांच्या अपमानावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शंकराचार्यांचा अपमान करण्यासाठी कोणाला शोधून आणले? रामभद्राचार्यांबद्दल काही बोलणे योग्य नाही, पण जर हा त्यांचा शिष्य असेल तर माझ्याकडून चूक झाली. आम्ही रामभद्राचार्यांवरील 420 चा गुन्हा मागे घेतला होता; त्यांना तेव्हा तुरुंगात पाठवायला हवे होते.

सरकार टिकणार नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर हल्ला चढवताना अखिलेश यादव म्हणाले की, हे सरकार आता टिकणारे नाही. जनतेने त्याला नाकारले आहे. जनता फक्त मतदानाची वाट पाहत आहे. जशा जनतेच्या वेदना वाढत आहे, तसतशी PDA (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) आघाडी अधिक मजबूत होत आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानांना विशेष राजकीय महत्त्व दिले जात आहे.
 

Web Title : अखिलेश यादव ने दोनों उपमुख्यमंत्रियों को मुख्यमंत्री पद का प्रस्ताव दिया।

Web Summary : अखिलेश यादव ने उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य और ब्रजेश पाठक को मुख्यमंत्री पद का प्रस्ताव दिया, और कहा कि दोनों में से कोई भी 100 विधायक लेकर आए। उन्होंने शंकराचार्य मामले पर सरकार की आलोचना की और पीडीए गठबंधन की ताकत पर प्रकाश डाला।

Web Title : Akhilesh Yadav offers UP CM post to both Deputy CMs.

Web Summary : Akhilesh Yadav offered the UP Chief Minister's post to Deputy CMs Keshav Prasad Maurya and Brajesh Pathak, asking either to bring 100 MLAs. He criticized the government over the Shankaracharya incident, predicting its downfall and highlighting PDA alliance strength.