छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:25 IST2025-07-15T17:25:53+5:302025-07-15T17:25:53+5:30
UP Crime : जबरदस्तीने हिंदू मुलींचे धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाची ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मालमत्ता ईडीच्या हाती लागली आहे.

छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
UP Crime : जबरदस्तीने शेकडो हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन करुमुल्ला उर्फ छांगूर बाबा सध्या चर्चेत आहे. छांगूर बाबाला अटक केल्यानंतर युपी सरकारने त्याच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला, शिवाय आता त्याचे आर्थिक नेटवर्कही उद्ध्वस्त केले जात आहे. आरोपीने परदेशी निधीतून भारतात कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जमवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, आरोपीची पुणे आणि मुंबईतही मालमत्ता आढळली आहे.
पुण्यात २०० कोटींची मालमत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत, ज्यात छांगूर बाबाने पुण्यातील मावळमधील आदिवासींकडून २०२३ साली १६ कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. या जमिनीची आजची किंमत २०० कोटींहून अधिक आहे. यासाठीचे ४९.८० लाख रुपये परदेशी निधीतून देण्यात आले होते. ही जमीन छांगूर बाबाच्या नावाने खरेदी करण्यात आली नव्हती, तर त्याचा जवळचा सहकारी नवीन घनश्याम रोहरा याच्यामार्फत खरेदी करण्यात आली होती.
टीव्ही९ हिंदीच्या वृत्तानुसार, छांगूर बाबा आणि त्याचे सहकारी जमीन विकून २०० कोटींचा नफा मिळवणार होते. ९ ऑगस्ट २०२३ रोजी या जमिनीसाठी एक करार करण्यात आला, ज्यामध्ये एकूण ६ नावे होती. या करारातील नफ्यापैकी अर्धा भाग बाबा छांगूर आणि त्याचा साथीदार नवीन रोहरा याचा आहे, तर उर्वरित अर्धा भाग मोहम्मद अहमद खानसह ३ आदिवासींचा आहे.
अनेक बँक खात्यांत कोट्यवधींचा व्यवहार
ईडीच्या मते छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बेनामी मालमत्ता जमवल्या आहेत. यात पुण्यात तीन आलिशान फ्लॅट्स, एक ट्रस्ट (आस्वी चॅरिटेबल ट्रस्ट) आणि ४० बँक खात्यांमध्ये १०६ कोटी रुपयांचा संशयास्पद निधी ट्रॅक करण्यात आला आहे. या खात्यांपैकी १८ खात्यांमध्ये फक्त तीन महिन्यांत ६८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, ज्यापैकी ७ कोटी रुपये परदेशी देणग्या आहेत.
नेटवर्क देशभर पसरले होते
धर्मांतरासाठी कोड शब्द वापरला जात होता. काजळ लावणे म्हणजे मानसिक प्रभाव किंवा लोभ देऊन आमिष दाखवणे आणि दर्शन म्हणजे छांगूर बाबाशी पहिली भेट. ही टोळी आध्यात्मिक उपचार, शिक्षण आणि लोककल्याणाच्या नावाखाली धर्मांतर करत असे. त्याचे नेटवर्क उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पसरले होते. छांगूर बाबाचे नेटवर्क त्याची विश्वासू नीतू उर्फ नसरीन आणि पती नवीन रोहरा यांच्यामार्फत चालवले जात होते.