संपूर्ण गुजरातमध्ये निर्विवाद वर्चस्व, पण या भागात आपने भाजपाला दिला जबर दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:26 IST2026-04-29T14:26:16+5:302026-04-29T14:26:16+5:30
Gujarat Local Body Election: काल लागलेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला. राज्यातील बहुतांश भागात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपाला गुजरातमधील आदिवासी भागात मात्र आम आदमी पक्षाने जबर धक्का दिला आहे.

संपूर्ण गुजरातमध्ये निर्विवाद वर्चस्व, पण या भागात आपने भाजपाला दिला जबर दणका
काल लागलेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला. राज्यातील १५ महानगरपालिकांसह अनेक नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपाने विजय मिळवला. राज्यातील बहुतांश भागात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपाला गुजरातमधील आदिवासी भागात मात्र आम आदमी पक्षाने जबर धक्का दिला आहे. आदिवासी बहूल असलेल्या नर्मदा जिल्ह्यात आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.
नर्मदा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २२ पैकी १५ जागांवर आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. त्याबरोबरच या जिल्ह्यातील ६ पैकी ४ पंचायत समित्यांमध्येही आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाला मिळालेल्या या विजयामुळे गुजरातमधील काही भागातही परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे संकेत मिळत आहे.
एकीकडे याच परिसरात असलेला सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातील सर्वात मोठा पुतळा गुजरातची नवी ओळख ठरत आहे. तसेच हजारो पर्यटक या भागाला भेट देत आहेत. विकासाचे दावे केले जात आहेत. मात्र जमिनीवर काही हकीकग वेगळीच आहे. विकासाचा खरा अर्थ लोकांच्या जीवनात बदल होणे हा असतो, असे आम आदमी पक्षाच्या विजयाने दाखवून दिले आहे. तसेच या भागात असलेली आम आदमी पक्षाची भक्कम संघटना आणि ग्राऊंड लेव्हलवरची पकडही दिसून आली आहे.