१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:40 IST2026-04-29T15:36:44+5:302026-04-29T15:40:15+5:30

Sankashti Chaturthi And Vinayak Chaturthi Angarak Yog May 2026: मे महिन्यातील दोन्ही चतुर्थ्यांना अंगारक योग जुळून येत आहे. यापैकी एक चतुर्थी अधिक मासात येत आहे. सविस्तर जाणून घ्या...

2 angarak yoga in may 2026 sankashti chaturthi and vinayak chaturthi will be special ganpati Bappa will make it auspicious know what to do | १ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?

१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?

Sankashti Chaturthi And Vinayak Chaturthi Angarak Yog May 2026: मराठी नववर्ष सुरू होऊन बरेच दिवस लोटले आहेत. मराठी नववर्षाचा दुसरा वैशाख मास सुरू आहे. सन २०२६चा मे महिना सुरू होत आहे. अनेकार्थाने मे महिना विशेष ठरणारा आहे. याची दोन मुख्य कारणे म्हणजे मे महिन्यातील दोन्ही चतुर्थींना अंगारक योग जुळून येत आहे आणि दुसरा अंगारक योग अधिक महिन्यात येत आहे. 

मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत अधिक मास पाळला जातो, असे सांगितले जाते. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे. तर, सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे.

विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे पुण्याचे मानले गेले

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. यंदा, २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे. त्यामुळे दोन चतुर्थी तिथी वाढणार आहेत. विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे पुण्याचे मानले गेले आहे. 

अंगारक योग म्हणजे काय? तो कधी जुळून येतो?

विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. अशी चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की, माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारक चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अंगारक संकष्ट चतुर्थी आणि अधिक मासातील विनायक चतुर्थीला अंगारक योग

प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्य दर्शनाला महत्त्व असते. तर प्रत्येक मराठी मासातील वद्य चतुर्थीला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्र दर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक योगाच्या चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. संपूर्ण वर्षात केवळ काहीच चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येतो. मे महिन्यात ०५ तारखेला वैशाख मासाची संकष्ट चतुर्थी असून, या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. तर, १७ मे २०२६ रोजी ज्येष्ठ अधिक मास सुरू होत असून, अधिक मासातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अधिक ज्येष्ठ महिन्यातील अंगारक विनायक चतुर्थी १९ मे २०२६ रोजी आहे.

अंगारक योग चतुर्थीला ‘या’ गोष्ट आवर्जून कराच

गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जास्वंदाचे फूल अर्पण करावे, लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा, असे सांगितले जाते.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title : मई 2026 में संकष्टी और विनायक चतुर्थी पर शुभ अंगारक योग

Web Summary : मई 2026 में संकष्टी और विनायक चतुर्थी दोनों पर अंगारक योग बन रहा है, जो बेहद शुभ माना जाता है। भक्तों को भगवान गणेश को दुर्वा, जास्वंद के फूल और लड्डू अर्पित करने चाहिए। गणपति अथर्वशीर्ष का पाठ या श्रवण भी फलदायी है, जिससे आशीर्वाद और मनोकामनाएं पूरी होती हैं।

Web Title : Auspicious Angarak Yog on Sankashti and Vinayak Chaturthi in May 2026

Web Summary : May 2026 brings double Angarak Yog on both Sankashti and Vinayak Chaturthi, considered highly auspicious. Devotees should offer Durva, Jaiswanda flowers, and Laddu to Lord Ganesha. Reciting or listening to Ganpati Atharvashirsha is also beneficial, ensuring blessings and fulfillment of wishes.