श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 07:43 PM2023-10-29T19:43:43+5:302023-10-29T19:44:30+5:30

या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.

terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert | श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकावर केला गोळीबार

file photo

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलीस निरीक्षकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी हे ईदगाह मैदानात काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, तेव्हा काही दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांना गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काश्मीर झोन पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, दहशतवादी घटना घडवण्यासाठी पिस्तूलचा वापर करण्यात आला आहे. घटनेनंतर तत्काळ परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

"गेल्या पाच वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये घट"
या घटनेच्या एक दिवस आधी, शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दावा केला होता की, केंद्रशासित प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या पाच वर्षात ऑपरेशन्स दरम्यान कोणतेही कोलेट्रल डॅमेज झाले नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. या पाच वर्षांत पोलिसांच्या कारवाईत एकही नागरिक जखमी झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, या वर्षात आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ३० घटना घडल्या आहेत, असेही दिलबाग सिंह यांनी सांगितले.

Web Title: terrorist attack in srinagar idgah area police inspector shot alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.