चेन्नई : तामिळनाडूत अभिनेते व आता राजकीय नेते असलेले तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) प्रमुख थलपती सी. जोसेफ विजय यांनी रविवारी येथे भव्य समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या माध्यमातून दक्षिणेतील या राज्यात ६० वर्षात प्रथमच प्रस्थापित द्रमुक व अण्णाद्रमुक पक्षांव्यतिरिक्त अन्य पक्षाचे सरकार स्थापन झाले.
जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या भव्य समारंभाला विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर, आई शोभा, प्रख्यात अभिनेत्री तृषा यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच अन्य प्रतिष्ठित लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, द्रमुकचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, अण्णाद्रमुकचे अध्यक्ष ई. के. पलानीस्वामी, विजय यांची पत्नी संगीता व दोन्ही मुले उपस्थित नव्हते.
असे आहे विजय यांचे मंत्रिमंडळ
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य ९ सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यात एस. कीर्तना या एकमेव महिला सदस्य आहेत.
याशिवाय विजय यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे एन आनंद, आधव अर्जुना, के. जी. अरुणराज, आर निर्मल कुमार, के. ए. सेंगोटय्यन, सीटीआर निर्मलकुमार, ए. राजमोहन व टी. के. प्रभू यांचा यात समावेश आहे.
नव्या युगाचा प्रारंभ
ही एक नवी सुरुवात आहे. वास्तविक धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाचे नवे युग आज सुरू होत आहे.
-सी. जोसेफ विजय, मुख्यमंत्री, तामिळनाडू
नव्या कल्पनेची निवड
तमिळनाडूने एक नवी पिढी, नवा आवाज आणि नव्या कल्पनेची ही निवड केली. विजय जनतेच्या आशा पूर्ण करतील.
- राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
आसाममध्ये पुन्हा सरमा सरकार, १२ मे रोजी शपथ
गुवाहाटी : आसाममध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए विधिमंडळ पक्षनेतेपदी डॉ. हिमंता बिस्व सरमा यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी ही घोषणा केली. १२ मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे.
केरळचे मुख्यमंत्री कोण?
केरळमध्ये काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल याबाबत रविवारीही अनिश्चितता कायम होती. पक्षाच्या हायकमांडनी अद्याप याबाबत निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून केरळमध्ये पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत चढाओढीबद्दल पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.
Web Summary : Actor Vijay became Tamil Nadu's CM, breaking DMK & AIADMK's hold. He promised free electricity. Rahul Gandhi attended the ceremony. Assam sees Sarma return as CM. Kerala's CM decision is pending.
Web Summary : अभिनेता विजय तमिलनाडु के मुख्यमंत्री बने, द्रमुक और अन्नाद्रमुक का दबदबा तोड़ा। उन्होंने मुफ्त बिजली का वादा किया। राहुल गांधी समारोह में शामिल हुए। असम में सरमा फिर मुख्यमंत्री। केरल के मुख्यमंत्री का फैसला लंबित।