CM Devendra Fadnavis on PM Modi: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र चटके आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील सिकंदराबाद येथील सभेतून देशवासीयांना काही गोष्टींचे आवाहन केले आहे. "येत्या एक वर्षापर्यंत सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल, डिझेल, तेल जपून वापरा असे मोठे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
सोनं खरेदी आणि परकीय चलन
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सोन्याच्या खरेदीवर विशेष भर दिला. "पूर्वीच्या काळी जेव्हा देशावर संकट यायचे, तेव्हा लोक सोन्याचे दान करायचे. आज मी दान मागत नाहीये, पण देशहित लक्षात घेऊन आपण किमान एक वर्ष तरी सोन्याचे दागिने खरेदी करणार नाही, असा निर्धार करावा. सोने आयातीमुळे देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते, ते वाचवणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी देशभक्ती ठरेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या वापरावर बंधने
आखाती देश आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला आहे. यावर भाष्य करताना पंतप्र मोदी म्हणाले की, "भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत, आपल्याला इंधन बाहेरून मागवावे लागते. त्यामुळे युद्धामुळे वाढलेल्या किमतींचा फटका आपल्याला बसत आहे. सरकारने दोन महिने हा बोजा स्वतःच्या खांद्यावर सोसला, पण आता नागरिकांनीही इंधन वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पंतप्रधानांच्या या आवाहनावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. जागतिक परिस्थिती पाहता देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगत फडणवीस यांनी जनतेलाही या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
"अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगभरात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये या गोष्टींची किंमत खूप वाढली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. पाकिस्तानात ४५० रुपये लिटरने पेट्रोल विकलं जात आहे. तरीही आपल्या पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. आपल्याला तेल, गॅस या सर्व गोष्टी मिळत आहेत. पण आपण या संकटाला समजून घेतलं नाही तर आणि याचा वापर योग्यरित्या वापर केला नाही तर आपल्यालाही तुटवड्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी जे सांगितले आहे त्यावर देशातल्या जनतेने पाळावे असं आमचं आवाहन आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
युद्धाचा थेट परिणाम
आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी असली तरी भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण आहे. पेट्रोल-डिझेलची बचत केल्यास परकीय चलनाची बचत होईल आणि युद्धामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Web Summary : CM Fadnavis supports PM Modi's appeal to save fuel and gas due to the global crisis. He highlights potential shortages and urges citizens to conserve resources, emphasizing the need for cooperation to stabilize India's economy amidst international conflicts.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने वैश्विक संकट के कारण ईंधन और गैस बचाने की पीएम मोदी की अपील का समर्थन किया। उन्होंने संभावित कमियों पर प्रकाश डाला और नागरिकों से संसाधनों का संरक्षण करने का आग्रह किया, अंतर्राष्ट्रीय संघर्षों के बीच भारत की अर्थव्यवस्था को स्थिर करने के लिए सहयोग की आवश्यकता पर जोर दिया।