-डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
गेल्या तीन-चार महिन्यांत मी जेवढ्या बिगर भाजप नेत्यांना भेटलो, ते सगळे म्हणत होते, दीदी म्हणजे ममता बॅनर्जी यांना हरवणे मुश्कील आहे. साम-दाम-दंड-भेद या सगळ्यात त्या वाकबगार आहेत. बंगालची नस त्यांच्या ताब्यात आहे. काही भाजप नेतेही दबक्या आवाजात म्हणत होते की, कदाचित दीदी निवडून येतील. अमित शाह यांचा चक्रव्यूह भेदणे ममता यांना कठीण जाईल, असे मला वाटत होते. पश्चिम बंगालमध्ये रोड शो करून महाराष्ट्रात परतलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, भाजपने २०० पेक्षा जास्त जागा घेतल्या, तर आश्चर्य वाटू देऊ नका.
कोलकाता आणि पश्चिम बंगालचे काही परिचित मला सांगत होते, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना लगाम घातला गेला, तर भाजपला सत्तेवर येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. शेवटी तेच झाले. अमितभाई शाह यांनी पक्की आखणी करून तृणमूलच्या गुंडांना जखडून ठेवले. केंद्रीय पोलिस दलाचे जवळपास अडीच लाख जवान कानाकोपऱ्यात तैनात केले गेले होते. जेणेकरून कोणी कोणाला मत देण्यापासून रोखू नये. निवडणुका भयमुक्त व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातून तडफदार अधिकाऱ्यांना निवडणूक निरीक्षक म्हणून बंगालमध्ये पाठवले.
अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये हिंमत निर्माण केली. ते स्वतः पूर्ण पंधरा दिवस पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून राहिले. प्रत्येक विभागात त्यांनी रात्रीचा प्रवास केला. रात्री बारा वाजेनंतरही ते बैठका घेत असत. त्यांचे उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट होते. मतदानाच्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत भाजपच्या बाजूची सगळी मते १००% नोंदवली जावीत. एसआयआरमध्ये सुमारे ९१ लाख अवैध मतदारांची नावे कापली गेल्यामुळे ममता बॅनर्जीची कंबर आधीपासूनच मोडली होती. शाह यांच्या व्यूहरचनेने पुढचे काम केले. ममता लढवय्या आहेत; परंतु यावेळी शेराला सव्वाशेर भेटला.
अमित शाह यांनी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि रोड शो केले. भाजपचे सरकार स्थापन होताच भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी ४५ दिवसांच्या आत जमीन देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली. सीमेवर कुंपण घालण्यासाठी ममता सरकार जमीन देत नव्हते. सीमा खुली असल्याने बांगलादेशमधील घुसखोर पश्चिम बंगालमध्ये येतात. हे घुसखोर ममतांच्या मदतीने भारतीय नागरिक होत आहेत, असा आरोप होत आला. त्याच्या बदल्यात ते तृणमूल काँग्रेसला मत देत आले. अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे असे आयोजन केले की, सर्व प्रमुख क्षेत्रात लोकांना पंतप्रधानांचे भाषण ऐकता यावे.
पंतप्रधान १९ जिल्ह्यांत २४ ठिकाणी प्रचारसभेत बोलले. त्यांनी रोड शोही केले. २५० पेक्षा जास्त मतदारसंघांत ते गेले. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितले, या विजयाचे खरेखुरे हक्कदार अमितभाई आहेत. अमित शाह यांनी २०१४ मध्ये घोषणा केली होती की, आम्ही ममता बॅनर्जीचे सरकार पश्चिम बंगालमधून उखडून टाकू. बारा वर्षे जरूर लागली; परंतु त्यांनी जे ठरवले होते ते करून दाखवले. २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. २०२१ मध्ये ती संख्या वाढून ७७ पर्यंत पोहोचली आणि २०२६ मध्ये आकडा २०७ वर गेला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न अमित शाह यांनी पुरे करून दाखवले.
पराभवानंतर ममता म्हणाल्या, त्यांच्या शंभर जागा भाजपने लुटल्या. राहुल गांधी म्हणतात की, ही मतचोरी आहे. मी कमीतकमी ५० वर्षापासून राजकारण अत्यंत जवळून पाहत आलो आहे. जे हरतात ते लाज झाकण्यासाठी आधीच कोणता ना कोणता बहाणा शोधून ठेवतात. आता पराभवाचे विश्लेषण होत नाही. केवळ आरोप केले जातात. केवळ चिडवल्याने समोरचा पैलवान कमजोर होत नाही. पैलवानाला हरवायचे असेल, तर स्वतःची ताकद वाढवावी लागते. आवश्यक ते डावपेचही शिकावे लागतात... अमित शाह यांनी पश्चिम बंगाल वाचवले, असे लोक बोलतात हे मी ऐकले आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी खरोखरच कमालीची आहे. जिंकतात; तेथे थांबत नाहीत. पुढच्या विजयाचे उद्दिष्ट समोर ठेवून पुढे निघतात. पराभूत झाले, तर पुढच्या विजयी निवडणुकीची तयारी सुरू करतात. ही जोडी अष्टोप्रहर काम करत आहे. विरोधी पक्षांनी यावरून काही शिकावे. केवळ बडबड केल्याने आणि आरोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी रात्रीची झोप खराब करून घ्यावी लागते. तेव्हा, कुठे उजेड दिसतो.
तामिळनाडूत विजय यांच्या विजयाने प्रकाश का पसरला? कारण द्रविड राजकारणापासून बाजूला होऊन विजय यांनी धर्मनिरपेक्ष राजकारणाचे नवे प्रारूप सादर केले. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प दिला. भाजपला आसाममध्ये तिसऱ्यांदा विजय का मिळाला? - दिलेली वचने त्यांनी पूर्ण केली. केरळमधला डाव्यांचा शेवटचा किल्ला का ढासळला? कारण डावे आजही बीजिंग किंवा मॉस्कोमध्ये पाऊस झाला, तर भारतात छत्र्या उघडतात !
लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे असेल, तर जनतेची नस ओळखावी लागते. मोदी आणि शाह लोकांची नस ओळखतात आणि त्यांच्या मनात काय चालले आहे, ते जाणतात.
vijaydarda@lokmat.com
Web Summary : Amit Shah's meticulous planning and strategic execution led to BJP's victory in West Bengal, overcoming Mamata Banerjee's stronghold. Shah focused on securing votes, curbing violence, and addressing border issues, ultimately fulfilling BJP's long-term goal. Modi praised Shah's pivotal role.
Web Summary : अमित शाह की सावधानीपूर्वक योजना और रणनीतिक क्रियान्वयन से पश्चिम बंगाल में भाजपा की जीत हुई, ममता बनर्जी के गढ़ को पार किया। शाह ने वोट हासिल करने, हिंसा को रोकने और सीमा मुद्दों को संबोधित करने पर ध्यान केंद्रित किया, अंततः भाजपा के दीर्घकालिक लक्ष्य को पूरा किया। मोदी ने शाह की महत्वपूर्ण भूमिका की सराहना की।