हृदयद्रावक! ब्रेसलेटमधला मोती गिळला अन् श्वासच थांबला; ६ वर्षांच्या मुलीने शाळेत जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:57 IST2026-02-17T14:55:50+5:302026-02-17T14:57:06+5:30
पहिलीत शिकणाऱ्या तापसी या ६ वर्षीय चिमुकलीचा मोती गिळल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या बदायूं येथील 'न्यू होप्स पब्लिक स्कूल'मध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या तापसी या ६ वर्षीय चिमुकलीचा मोती गिळल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तापसीने शाळेत आपल्या हातातील ब्रेसलेटचा मोती तोंडात टाकून चावला आणि तो गिळला, ज्यामुळे तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शाळा प्रशासन आणि नातेवाईकांनी तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेलं, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शाळेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना अलापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ककराला भागातील आहे.
घटनेच्या वेळी वर्गात असलेल्या दुसऱ्या एका मुलीने सांगितलं की, तापसीने ब्रेसलेटचा मोती तोंडात टाकला होता. शिक्षिकेने माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी पालकांना बोलावलं. तापसीची आजी शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या गाडीतून तिला बदायूं येथील ईएनटी तज्ज्ञांकडे नेण्यात आलं. तिथून तिला सर्जनकडे आणि नंतर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. तापसीचे वडील टेकचंद यांनी शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना सांगितलं की, ती मुलगी आमच्यासाठीही स्वतःच्या मुलीसारखी होती. शाळा प्रशासनाने तातडीने नातेवाईकांना कळवलं आणि सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, सत्य समोर येण्यासाठी शाळेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहेत. ते तपासात पूर्ण सहकार्य करत असून शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
अलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक माधव सिंह बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातून मेमो मिळाल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन केलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या नातेवाईकांकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळाल्यास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तथ्यांच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवून योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.