Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:02 IST2025-11-21T12:00:13+5:302025-11-21T12:02:19+5:30
Shaurya Patil Case: सांगलीच्या १६ वर्षाच्या शौर्य पाटीलने शाळेतून बाहेर पडल्यानंतर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने सुसाईड नोटही लिहिली होती. त्याच्या आत्महत्येनंतर शाळेत घडलेला घटनाक्रम समोर आला आहे.

Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
Shaurya Patil News: सांगलीच्या १६ वर्षीय शौर्य पाटीलच्या कुटुंबासाठी मंगळवारची सकाळ वेदनादायी ठरली. शाळेत गेलेल्या शौर्यच्या मृत्युचीच बातमी त्यांना मिळाली. दिल्लीत शाळेत शिकत असलेल्या शौर्य पाटीलने राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या केली. पण, त्याने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत असं काही घडलं होतं, जे त्याला सहन करण्यापलिकडे झाले. शाळेत घडलेल्या घटनाक्रमाबद्दला आता माहिती समोर आली आहे.
शौर्य पाटील नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेतील त्याच्या शिक्षिकेने आणि प्राचार्यांनी त्याला डान्सचा सराव करण्यास सांगितले. शौर्य पाटीलचा पाय मुरगळला होता. त्यामुळे त्याला त्रास होत होता. त्याने शिक्षिकांना याबद्दल सांगितले, पण कुणीही त्याचे म्हणणं ऐकून घेतलं नाही.
त्याला डान्सर बनायचे होते, पण...
शिक्षकांनी त्याला वर्गात अपमानास्पद वागणूक दिली आणि डान्स करावाच लागेल, असे सांगत इशाराही दिला. त्यामुळे तो नाराज झाला. शौर्यच्या शाळेतील मित्राने सांगितले की, "तो मागील बऱ्याच काळापासून अडचणींचा सामना करत होता. ही काही पहिलीच घटना नव्हती. अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या की, सेंट कोलंबस शाळा चांगली नाहीये आणि शिक्षकही नीट बोलत नाहीत."
"शौर्यची डान्सर व्हायची इच्छा होती. त्यामुळे तो ड्रामा क्लबही सक्रिय असायचा. पण, ड्रामा टीचर त्याला त्रास द्यायच्या आणि अपमानित करायच्या. त्या म्हणायच्या की तू ओव्हरअॅक्टिंग करतो आणि तू अभियन करू नकोस."
ज्या दिवशी शौर्यने आत्महत्या केली, त्याआधी शाळेत त्याला शिक्षिकांनी डान्स करायला सांगितलं. त्याला इशारा दिला गेला. त्यानंतर शौर्य शाळेच्या मागील गेटमधून बाहेर पडला आणि त्याचा जो पिक अप पॉईंट होता तिथेच पोहोचलाच नाही. तो थेट मेट्रो स्टेशनमध्ये गेला आणि आत्महत्या केली. त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले की, आम्हाला कळवण्यात आले की, त्याने मेट्रो स्टेशनवरून उडी मारली आहे.
शौर्य पाटीलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?
"जो कोणी हे वाचत असेल, माझे नाव शौर्य पाटील आहे. कृपया या ९९११५९XXXX नंबरवर कॉल करा. मी हे केले याचे मला खूप दुःख आहे. शाळेतील लोक मला इतकं बोलले की, मला हे करावं लागलं. माझ्या शरीराचा कोणताही अवयव जर उपयोगी असेल किंवा काम करण्याच्या स्थितीत राहिला असेल, तर कृपया तो ज्याला खरोखर गरज आहे, अशा व्यक्तीला दान करा."
"माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले, आय एम सॉरी, मी त्यांना काहीच देऊ शकलो नाही. सॉरी भैया, मी खूप उद्धट होतो. सॉरी मम्मी, मी तुझे मन खूप वेळा दुखावलं. आता शेवटच्या वेळी तुमचा विश्वास तोडत आहे. शाळेचे शिक्षक असे आहेत की, काय बोलू! युक्ती मॅम, पाल मॅम, मनू कालरा मॅम. माझी अंतिम इच्छा आहे की, या सगळ्यांवर कठोर कारवाई केली जावी."
"माझ्यासारखं दुसऱ्या कोणत्याही मुलाला असं काही करावं लागू नये, अशी माझी इच्छा आहे. आता कृपया यापुढे वाचू नका. हा भाग फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. सॉरी भैया, मी तुला शिवीगाळ केली, तुझ्याशी वाद घातला. मोठ्या भावाचा जो आदर करायला हवा होता, तो मी केला नाही. व्हेरी सॉरी पापा, तुम्ही मला वेप साठी कधीही माफ करणार नाही आणि करायलाही नको."
"मी तुमच्यासारखा एक चांगला माणूस बनायला हवे होते. मम्मी, तूच आहेस जिने मला नेहमी पाठिंबा दिला. जसा पार्थ भैयाला आणि बाबांनाही (तुम्ही) करता. मला वाईट वाटत आहे, पण सेंट कोलंबसच्या शिक्षकांनी हे माझ्यासोबत केले आहे."