केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:06 IST2025-05-17T14:03:57+5:302025-05-17T14:06:16+5:30
Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर यांचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेस अवाक् झाली आहे.

केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत त्याचा घेतलेला बदला, पुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष आणि युद्धविराम, या सर्व घडामोडींमुळे भारतीय उपखंडामध्ये मागच्या महिनाभरापासून कमालीचं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताकडून पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर यांचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेस अवाक् झाली आहे. आपण दिलेल्या चार नावांपैकी कुणाचाच या शिष्टमंडळात समावश केलेला नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी १६ मे रोजी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये समावेश करण्यासाठी चार नावं सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र लिहून आनंद शर्मा, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन आणि राजा बरार यांची नावं सूचवली होती. मात्र केंद्र सरकारने या चारही नावांना वगळून काँग्रेस पक्षाच्या वतीने शशी थरूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर हे करणार असून. या शिष्टमंडळामध्ये भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोळी, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.
दहशतवादाबाबत भारताची झीरो टॉलरेंस धोरण जगापर्यंत पोहचवणे, हा हे शिष्टमंडळ पाठवण्यामागचा मुख्य हेतू आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्व प्रमुख पक्षातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून दहशतवादाविरोधात भारत एकजूट आहे असे संकेत दिले जात आहेत. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट उभा राहतो. ७ सदस्यीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख देशांचा दौरा करेल. तिथे दहशतवादाविरोधात भारताच्या धोरण स्पष्ट करेल. राजकारण आणि मतभेद यापेक्षा राष्ट्रीय एकता शक्तीशाली प्रतिक असल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार, हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करणार आहे. हा परदेश दौरा २२ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे.