सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:06 IST2026-01-15T11:05:46+5:302026-01-15T11:06:12+5:30
Rajasthan Accident News: सासू, पाच सुना आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
सासू, पाच सुना आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या कुटुंबाच्या नात्यातील एका महिलेचं निधन झालं होतं. तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊन हे कुटुंबीय काही वाहनांमधून माघारी परतत होते. त्यात या सर्व महिला एका कारमध्ये बसल्या होत्या. ही कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर हरसावा गावाजवळ आली असताना कारच्या चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही कार आधी एका पीकअपवर आदळली आणि तशीच फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली.
या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच कारमधून प्रवास करणारी वृद्ध सासू, पाच सुना आणि मुलगी अशा मिळून ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सासू मोहिनी देवी आणि चंदा देवी, तुलसी देवी, बरखा देवी, आशा देवी, संतोष देवी या सुना आणि इंदिरा या मुलगीचा समावेश होता. तर सोनू आणि कारचालक वसीम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हरसावा गावाजवळ ही कार पोहोचली असतानाच कारचालकाने ओव्हरटेक कऱण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, भरधाव वेगामुळे कारवरचं त्याचं नियंत्रण सुटलं आणि ही कार पिकअपवर आदळली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये जाऊन घुसली. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथून जात असलेल्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात एवढा भीषण होता की त्यात यापैकी काही महिलांचा आधीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, अंत्यसंस्काराहून परतताना कुटुंबीयांनी कारचालकाला वाहन हळू चालवण्याबाबत बजावले होते. मात्र त्याने भरधाव वेगात कार चालवली आणि ही भीषण दुर्घटना घडली, अशी माहितीही समोर येत आहे.