पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 05:57 IST2026-05-02T05:56:34+5:302026-05-02T05:57:16+5:30
५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांनी वाढ, भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.

पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
नवी दिल्ली/मुंबई : केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली. १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ९९३ रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली असून, छोट्या व्यावसायिक ५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सामान्य ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला आहे. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी ३ हजार २४ रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही किंमत २ हजार ३१ रुपये होती, असे हॉटेल चालकांनी सांगितले. तर ५ किलोचे सिलिंडर आता ५४९ ऐवजी ८१० रुपयांना मिळेल. निवडणुकीनंतर लगेच झालेल्या या दरवाढीमुळे लघुउद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि कॅटरिंग व्यवसायांवर थेट परिणाम होणार आहे. तेल कंपन्या दरमहा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन दर निश्चित करतात.
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?
व्यावसायिक सिलिंडर पाठाेपाठ आता पेट्राेल आणि डिझेलच्या दरात ४ ते ५ रुपये आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ हाेण्याचे संकेत शुक्रवारी रात्री अधिकृत सूत्रांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गेल्या चार वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल १२६ डॉलर या चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यात किंचित घसरण झाली असली, तरी दर अजूनही ११० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त आहेत. होर्मुझमधून होणाऱ्या तेलवाहतुकीवर परिणाम, तसेच इराण आणि अमेरिकेमधील तणाव यामुळे जागतिक तेलबाजारातील अनिश्चितता कायम आहे. यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.