मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 05:50 IST2026-05-02T05:50:14+5:302026-05-02T05:50:50+5:30
एनसीबीने भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून ही कारवाई केली.

मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
मुंबई - नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने धडक कारवाई करीत १,७४५ कोटी रुपये मूल्याचे ३४९ किलो अमली पदार्थ जप्त केले. अलीकडच्या काळातील अमली पदार्थांच्या विरोधातील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. नवी मुंबईतील कळंबोली आणि भिवंडी येथून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’ म्हणून करण्यात आलेल्या कारवाईची तयारी सहा महिन्यांपासून सुरू होती. एनसीबीने भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून ही कारवाई केली. अमली पदार्थांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला असून, याच आठवड्यात कुख्यात अमली पदार्थ तस्कर आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम डोला यालादेखील अटक केली आहे. त्याचे तुर्कस्थान येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
नागपूरमध्ये अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशिन
राज्यात अमली पदार्थांविरोधात कडक पावले उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनापासून अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशिनचा वापर सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरच वाहनचालकांची तपासणी करता येणार असून, अमली पदार्थांचे सेवन केल्यास तत्काळ रिपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे रेव्ह पार्टी किंवा रात्री उशिरा नशेत वाहन चालवणाऱ्यांवर थेट कारवाई करणे शक्य होणार आहे. नागपूरनंतर लवकरच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही ही सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवली जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले एनसीबीचे कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर या कारवाईचे कौतुक केले आहे. “अमली पदार्थांविरोधात आम्ही कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन जप्त करून एनसीबीने आंतरराष्ट्रीय रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या पथकाचे अभिनंदन,” अशा शब्दांत त्यांनी पथकाची पाठ थोपटली आहे.
असे लपविले होते कोकेन
भिवंडी येथे जप्त करण्यात आलेले कोकेन हे यंत्रसामग्रीच्या आतल्या कप्प्यात लपविण्यात आले होते. प्रत्येक पॅकेट नऊ स्तरांच्या पॉलिथिनमध्ये पॅक केलेले असून, त्यात काळ्या चिकट पदार्थाचाही वापर करण्यात आला होता.
क्रिकेट पॅड्समध्ये लपवले कोकेन
कळंबोलीच्या केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळ एका मारुती गाडीच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात कोकेनची सुमारे १ किलो वजनाची १३६ पाकिटे आढळून आली. ती क्रिकेट पॅड्स व ग्लोव्हजमध्ये लपवून ठेवली होती. एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीदरम्यान भिवंडी येथील साठ्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी राहनाळ गाव येथील गोदामातून २१३ पाकिटे जप्त केली.