Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 08:56 IST2025-07-05T08:56:13+5:302025-07-05T08:56:52+5:30
Gopal Khemka Shot Dead: दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली.

Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
Gopal Khemka Murder:बिहारची राजधानी पाटणा येथे एका धक्कादायक घटनेत शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची शुक्रवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गांधी मैदान पोलीस स्टेशन परिसरातील रामगुलाम चौकाजवळ, हॉटेल पानशजवळ ही घटना घडली. या हत्येने पाटणा शहरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११:४५च्या सुमारास गोपाळ खेमका हे हॉटेल पनाशजवळील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली. गोळी लागताच खेमका रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. खेमका यांना तातडीने पाटण्यातील मेडिव्हर्सल रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून तपास सुरू; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक गोळी आणि एक काडतूस जप्त केले आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे आणि शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ही हत्या अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असून, यामध्ये व्यावसायिक गुन्हेगारांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात शोककळा
गोपाळ खेमका हे शहरातील एक प्रतिष्ठित आणि यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. ते केवळ एक व्यावसायिकच नव्हे, तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते मगध रुग्णालयाचे मालक होते. त्यांच्या अचानक जाण्याने शहराच्या व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे. अनेक व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांनी या हत्येचा निषेध केला असून, दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे खेमका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये गोपाळ खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका यांचीही हाजीपूर औद्योगिक क्षेत्रात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे ही हत्या आणि पूर्वीच्या घटनेतील काही संबंध आहे का, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, व्यावसायिक शत्रुत्व, जमिनीचा वाद किंवा इतर कोणतेही वैयक्तिक कारण या हत्येमागे असू शकते. पोलीस सर्व संभाव्य पैलूंचा सखोल तपास करत आहेत. राजधानीच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरात एका प्रसिद्ध उद्योजकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने पाटण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या घटनेपासून परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस सतत गस्त घालत आहेत. पोलिसांनी सध्या एफआयआर नोंदवला असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.