पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:38 IST2025-04-25T16:38:15+5:302025-04-25T16:38:52+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार पाकिस्तानविरोधात मोठमोठ्या कारवाया करत आहे.

पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार पाकिस्तानविरोधात मोठमोठ्या कारवाया करत आहे. याचाच भाग म्हणून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज(शुक्रवार) देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. ही यादी लवकरात लवकर केंद्राला पाठवावी, जेणेकरुन त्यांचे व्हिसा तात्काळ रद्द करता येतील आणि त्यांना भारताबाहेर पाठवता येईल, असेही केंद्राने म्हटले.
केंद्र सरकार अॅक्शनमोडमध्ये
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक आणि एका नेपाळी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2029 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना टीआरएफचा हात आहे. आता याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलयला सुरुवात केली आहे. यामध्ये 1960 चा सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी-वाघा सीमा क्रॉसिंग बंद करणे, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना नवी दिल्लीतून हाकलून लावणे आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यांचा समावेश आहे.
व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करून ती केंद्र सरकारला पाठवण्यास सांगितले आहे. सरकारने आधीच जाहीर केले आहे की, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द केले जातील, तर वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध राहतील. याशिवाय, भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अमित शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि आपापल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांचे व्हिसा रद्द करण्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.