"आपला देश अधिक बलशाली झाला..."; भारताच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरील टीकेला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 21:46 IST2026-02-19T21:44:57+5:302026-02-19T21:46:29+5:30
संरक्षण संपादन परिषदेने (DAC) या महिन्याच्या सुरुवातीला ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण व्यवहार मानला जात आहे.

"आपला देश अधिक बलशाली झाला..."; भारताच्या ११४ राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरील टीकेला फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचं उत्तर
राफेल लढाऊ विमानांच्या डीलवरून होणारी टीका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेटाळून लावली आहे. तसेच, "या संरक्षण करारामुळे भारत अधिक बलशाली झाला आहे. आम्ही राफेलमधील स्वदेशी उपकरणांचे प्रमाण सातत्याने वाढवत आहोत. ही प्रक्रिया कंपनी आणि भारत सरकार यांच्यातील चर्चेचा भाग आहे. यावर टीका होण्याचे कारण नाही, कारण यामुळे भारताचेच सामर्थ्य वाढते. आपले धोरणात्मक संबंध सुधारतात आणि भारतात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतात," असे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मॅक्रॉन यांनी, दोन्ही देशांमधील संबंधांचा 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' म्हणून उल्लेख केला.
मॅक्रॉन म्हणाले, भारताने नुकतीच राफेल विमानांसाठी नवीन ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "राफेलवर, आम्हाला पुढे जायचे आहे. काही दिवसांपूर्वी, भारताने ११४ नवीन राफेल विमानांची एक नवीन बॅच ऑर्डर करण्याची आणि त्यांचे एकत्रित उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली. 'मेक इन इंडिया' हा या नवीन ऑर्डरचा एक महत्त्वाचा घटक असेल," असेही त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, विद्यमान सहकार्य बळकट होण्याच्या दृष्टीने हे एक नवीन पाऊल आहे, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
#WATCH | Delhi | On India to buy 114 French Rafale jets, French President Emmanuel Macron says, "... We are always increasing indigenous components. It's part of the dialogue between the company and your government. I don't see how people can criticise because it makes your… pic.twitter.com/detQEPAt48
— ANI (@ANI) February 19, 2026
आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार? DAC चीही मंजुरी -
संरक्षण संपादन परिषदेने (DAC) या महिन्याच्या सुरुवातीला ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण व्यवहार मानला जात आहे.
भारतीय वायुसेनेच्या दृष्टीने महत्वाचा सौदा -
भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्वाचा ठरेल. रशिया आणि अमेरिकेने प्रत्येकी Su-57 आणि F-35 सारखी पाचव्या पिढीतील विमाने ऑफर केली होती. मात्र, भारताने राफेलवरच विश्वास ठेवला. भारताने १८० स्वदेशी 'तेजस Mark-1A' विमानांची ऑर्डर दिली आहे. मात्र, इंजिन पुरवठ्यातील विलंबामुळे त्यांच्या डिलिव्हरीला वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत हवाई दलातील विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी राफेल डील महत्त्वाची मानली जात आहे.