Omicron Variant: जगात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणं कठीण, आता..; तज्ज्ञांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:18 PM2021-12-03T18:18:41+5:302021-12-03T19:56:29+5:30

ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. ज्या ज्या देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले तिथे आठवडाभरातच रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली

Omicron Variant: Impossible to stop the rapidly spreading Omicron in the world says Expert | Omicron Variant: जगात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणं कठीण, आता..; तज्ज्ञांना चिंता

Omicron Variant: जगात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणं कठीण, आता..; तज्ज्ञांना चिंता

Next

नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं अनेक देशांची चिंता वाढवली आहे. अचानक या व्हेरिएंटनं पुन्हा एकदा जगाची झोप उडवली आहे. आतापर्यंत २२ हून अधिक देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट पोहचला आहे. भारतातही गुरुवारी ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळले. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमित करत असल्याचं WHO चं म्हणणं आहे.

त्यातच आता तज्ज्ञांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे वित्त सचिव अनिय गोयल यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखणं शक्य नाही. त्यामुळे आता याच्या उपचारावर लक्ष द्यायला हवं असं म्हटलं आहे. एम्सच्या पब्लिक हेल्थ डिपार्टंमेंटमधील प्रोफेसर संजय सिंह यांनी आता देशातील आरोग्य व्यवस्था कशी आहे? हॉस्पिटलमधील सुविधांकडे लक्ष द्यायला हवं असं सांगितले आहे. आगामी काळात लोकांना घाबरण्याची नव्हे तर सतर्क राहण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले आहे.

संक्रमणात वेगाने वाढ होतेय

ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत. ज्या ज्या देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले तिथे आठवडाभरातच रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. सर्वात आधी हा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला तेव्हा मागील आठवड्याच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत ३८८ टक्क्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. ओमायक्रॉन कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हेरिएंटनं आतापर्यंत जगातील ३० देशांमध्ये शिरकाव केला आहे. २७ नोव्हेंबरपासून एका आठवड्यातच ११ देशांमध्ये नव्या व्हेरिएंटचा पुष्टी झाली. बोत्सवाना, नेदरलँड वगळता बाकी ९ देशात ३ टक्क्यांवरुन ३८८ टक्के कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. इस्त्राइल ७८ टक्के, हाँगकाँग २७ टक्के, इटली २४ टक्के, चेक गणराज्य ११ टक्के तर बेल्झियमममध्ये १० टक्के रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

भारतात बूस्टर डोसची शिफारस

 इतर देशांप्रमाणे आता भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे ४० वर्षावरील सर्व लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा  अशी शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस केंद्र सरकारला टॉप इंडियन जीनोम साइंटिस्टकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्राने निर्णय घेतल्यास ४० वर्षावरील लोकांना लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.

ही शिफारस भारतीय SARS Cov 2 जीनोमिक्स सिक्वेंसिंग कंसोर्टियमने त्यांच्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये केली आहे. INSACOG कोरोनाचा जीनोमिक व्हेरिएशन मॉनिटर करण्यासाठी भारत सरकारने नॅशनल टेस्टिंग लॅबचं नेटवर्क बनवलं होतं. INSACOG बुलेटिनमध्ये म्हटलंय की, ज्या लोकांनी लस घेतली नाही अशांचं लसीकरण आणि ४० वर्षावरील लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला जाऊ शकतो. सर्वात आधी मोस्ट हायरिस्क लोकांना प्राधान्य द्यायला हवं.सध्या लोकसभेत कोरोनावर चर्चा सुरु आहे त्यावेळी खासदारांनी बूस्टर डोसची मागणी केली अशावेळी ही शिफारस आली आहे.

भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव

आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. हे दोन्ही रुग्ण ६६ आणि ४६ वर्षाचे आहेत. दोघांनीही लसीचे डोस घेतले होते. या दोन्ही रुग्णात कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यातील एक व्यक्ती भारतातून दुबईला गेला आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉननं संक्रमित रुग्ण आढळले आहेत. WHO ने व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये ओमायक्रॉनचा समावेश केला आहे. सर्वात पहिले दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले होते.

Web Title: Omicron Variant: Impossible to stop the rapidly spreading Omicron in the world says Expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.