'विकसित भारत'च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! PM मोदींनी सांगितले भारत-अमेरिका व्यापार कराराचे मोठे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:58 IST2026-02-07T09:49:23+5:302026-02-07T09:58:11+5:30
पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेसोबतच्या कराराचे स्वागत करण्यात आले असून हे विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले.

'विकसित भारत'च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! PM मोदींनी सांगितले भारत-अमेरिका व्यापार कराराचे मोठे फायदे
PM Modi on India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका या दोन जगातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी एका ऐतिहासिक व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांमधील तणाव निवळला असून, भारतासाठी मेक इन इंडिया आणि रोजगाराच्या नव्या संधींची दारे उघडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात या करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या केल्या जातील. या कराराचे दोन मुख्य भाग आहेत. यानुसार ऑगस्ट २०२५ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेला २५ टक्के अतिरिक्त शुल्क आता पूर्णपणे हटवला आहे. आता भारतीय वस्तूंवर केवळ १८ टक्के शुल्क आकारले जाईल. भारतही अमेरिकेतील औद्योगिक उत्पादने आणि कृषी मालावरील आयात शुल्क कमी करण्यास तयार झाला आहे.
"भारत-अमेरिकेसाठी मोठी बातमी"; पंतप्रधान मोदींची पोस्ट
पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "हा करार आमच्यातील वाढता विश्वास आणि भागीदारीचे प्रतीक आहे. यामुळे भारताचे मेहनती शेतकरी, उद्योजक, स्टार्टअप आणि मच्छिमार यांच्यासाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल. विशेषतः महिला आणि तरुणांसाठी हा करार रोजगाराची मोठी संधी घेऊन येईल."
"भारत आणि अमेरिकेसाठी आनंदाची बातमी! आपल्या दोन महान राष्ट्रांमध्ये एका मध्यवर्ती व्यापार कराराच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दाखवलेल्या वैयक्तिक स्वारस्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा करार आपल्यातील वाढता विश्वास आणि भागीदारीचे प्रतीक आहे. यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील कष्टकरी शेतकरी, उद्योजक, लघु-मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि मच्छिमार यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. तरुण आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारत आणि अमेरिका दोघेही नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन देतात. या करारामुळे गुंतवणूक वाढेल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी अधिक घट्ट होईल. यामुळे जागतिक पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल आणि जगाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
"विकसित भारत घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना, आम्ही भविष्याचा विचार करणाऱ्या आणि लोकांचे सक्षमीकरण करणाऱ्या अशा जागतिक भागीदारीसाठी कटिबद्ध आहोत," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
ट्रम्प यांनी का मागे घेतले शुल्क?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत शुल्क कपातीचा निर्णय घेतला. भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे आणि अमेरिकेसोबतचे सुरक्षा संबंध अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणात अमेरिकेला ठोस सहकार्य करण्याचे पाऊल उचलल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले आहे.
भारतात कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
भारताने अमेरिकेतील खाद्य आणि कृषी उत्पादनांवर शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुका मेवा आणि ताजी फळे, सोयाबीन तेल, मद्य, पशुखाद्यासाठी लागणारे लाल ज्वार आणि इतर औद्योगिक वस्तू यांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय निर्यातदारांना अच्छे दिन
दुसरीकडे, अमेरिकेने शुल्क १८ टक्क्यांवर आणल्यामुळे भारताची कापड आणि रेडिमेड कपडे, चामड्याच्या वस्तू, प्लास्टिक, रबर, हस्तशिल्प आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंची अमेरिकेतील निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.