"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:11 IST2025-11-21T13:10:57+5:302025-11-21T13:11:48+5:30
जयपूरमधील नीरजा मोदी शाळेतील चौथीत शिकणाऱ्या अमायराच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
जयपूरमधील नीरजा मोदी शाळेतील चौथीत शिकणाऱ्या अमायराच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तिची आई ढसढसा रडली. प्रत्येक वाक्यातून वेदना आणि कधीही भरून न येणारं नुकसान स्पष्टपणे दिसून आलं. २२ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये कँडल मार्च काढण्यात येईल, जिथे कुटुंबातील सदस्य आणि पालक न्यायाची मागणी करण्यासाठी चार तासांचं मौन व्रत ठेवणार आहेत..
अमायराची आई रडत रडत म्हणाली, "रोज सकाळी मी उठते तेव्हा मला असं वाटतं जर मी तिला त्या दिवशी शाळेत पाठवलं नसतं तर बरं झालं असतं. जयपूरला शिफ्ट केल्यानंतर तिला नीरजा मोदी शाळेत एडमिशन घेतलं नसतं तर आज अमायरा असती." अमायराचे वडील विजय यांनी शाळा प्रशासनाला थेट जबाबदार धरत म्हटलं की, "शाळेच्या निष्काळजीपणाने माझ्या मुलीचा जीव घेतला. जोपर्यंत नीरजा मोदी शाळेची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या अमायराला न्याय मिळणार नाही."
"मुलीने हॅलोविनमध्ये काही पाहिलं होतं का?"
शिक्षण विभाग किंवा पोलिसांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमायराच्या वडिलांनी एक धक्कादायक खुलासा केला, ते म्हणाले, "एका अधिकाऱ्याने मला विचारलं की मुलीने हॅलोविनमध्ये काही पाहिलं होतं का? तिला स्वप्न पडले होतं का?" तपास करण्याचा हा मार्ग आहे का? ज्या वडिलांची मुलगी आता या जगात नाही त्यांना असे प्रश्न विचारले जातात का?"
"मला शाळेत जायचं नाही, प्लीझ पाठवू नका..."
९ वर्षांच्या अमायराने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आईने मोठा खुलासा केला होता. "मला शाळेत जायचं नाही, प्लीझ पाठवू नका..." असं अमायरा तिच्या आईला सांगत होती. आई शिवानीने याचं ऑडिओ रेकॉर्डिंग सर्वांना दाखवलं. शिवानीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेला याबाबत माहिती देण्यात आली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.
गेल्या वर्षभरापासून जयपूरच्या नीरजा मोदी शाळेतील ९ वर्षांच्या अमायराचे पालक शाळेतील शिक्षकांकडे तक्रार करत होते की, काही मुलं अमायराची छेड काढतात, तिला टोमणे मारतात आणि तिची चेष्टा करतात. शाळेतील शिक्षकांशी अनेक वेळा बोलले, पण ते दुर्लक्ष करत राहिले. अमायराच्या वडिलांनी देखील मीटिंगमध्ये याबाबत माहिती दिली होती. अमायराने तिला त्रास देणाऱ्या काही मुलांची नावं सांगितली होती.