...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:37 PM2024-06-19T14:37:00+5:302024-06-19T14:37:37+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी इंडिया आघाडीने भाजपाला २४० जागांवर अडवले. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज लागत आहे. 

NDA government at the center may collapse; Congress MP Rahul Gandhi's claim | ...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीएकडे संख्याबळ खूप कमी आहे. जराही गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, सरकारकडे संख्याबळ इतकं कमी आहे त्यामुळे जरा काही गडबड झाली तरी सरकार पडू शकते. एनडीएतील घटक पक्षांना दुसऱ्या बाजूला जावं लागू शकते. एनडीएतील काही पक्ष आमच्या संपर्कात आहेत. मोदी यांच्या नेतृत्वात ते असमाधानी आहेत असं त्यांनी सांगितले. परंतु एनडीएतील कुठले पक्ष संपर्कात आहेत त्याची नावे राहुल गांधी यांनी सांगितली नाहीत. 

तसेच द्वेषपूर्ण राजकारण हे भारतीय जनतेनं नाकारलं आहे. २०१४ आणि २०१९ या कार्यकाळात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी काम केले ते काम आता करू शकत नाही. लोकसभा निकालात इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्यात. तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे २९३ जागा आहेत. राहुल गांधी भारतीय राजकारणात खूप पुढे गेलेत. लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी राहुल गांधींना मिळू शकते असं काँग्रेस नेते सांगत आहेत. 

दरम्यान, ज्या पक्षाने मागील १० वर्ष अयोध्येचं सांगत घालवले त्यांना अयोध्येत हरवलं आहे. भाजपा धर्माच्या नावावर राजकारण करून द्वेष पसरवत आहे. विरोधी पक्षाने जी चांगली कामगिरी केली त्यात भारत जोडो यात्रेचं मोठं योगदान आहे. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली परंतु मागील २ लोकसभेप्रमाणे यंदा भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकली नाही. सरकार बनवण्यासाठी त्यांना एनडीएच्या घटक पक्षावर निर्भर राहावं लागतंय असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. 

वायनाडमधून प्रियंका गांधी लढणार

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले. त्यात राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडला. त्याठिकाणी आता काँग्रेसकडून पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांना उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रियंका गांधीही संसदेत दिसतील असं चित्र सध्या दिसत आहेत. 
 

Web Title: NDA government at the center may collapse; Congress MP Rahul Gandhi's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.