राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:33+5:302014-12-28T23:40:33+5:30

मणिपूरच्या शाळेत आठ मानवी कवट्या

National Important-In-Home Page | राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

िपूरच्या शाळेत आठ मानवी कवट्या
इम्फाल - पश्चिम इम्फाल जिल्ह्यातील टोंबिसाना हायस्कूलमध्ये २६ डिसेंबर रोजी केलेल्या खोदकामात आठ मानवी कवट्या सापडल्या आहेत. सध्या विद्यालयाचा परिसर रिकामा असून, १९८० मध्ये येथे केंद्रीय निमलष्करी दल वास्तव्याला होते. येथील अनेक सामाजिक संघटनांनी या परिसरातील खोदकाम थांबवून प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंह यांच्याकडे केली आहे.

डेराप्रमुखाविरुद्ध आज दाखल होणार गुन्हा
नवी दिल्ली - सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांच्याविरुद्ध त्यांच्या आश्रमातील अनुयायांची बळजबरीने संततीनियमन शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी सीबीआयतर्फे आज सोमवारी गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता आहे. सीबीआय सूत्रांनी ही माहिती दिली.

तिहारमधील कैद्यांचे स्थानांतरण
नवी दिल्ली - तिहार कारागृह प्रशासनाने कैद्यांमधील गटबाजीला लगाम घालण्याच्या दृष्टीने ६,००० कैद्यांचे राहण्याचे ठिकाण बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी एकासारख्या प्रकरणातील आरोपींना सोबत ठेवले जात होते. कारण त्यांना न्यायालयात हजर करणे सोयीचे होत होते. परंतु वाढती कटकारस्थाने आणि गटबाजी लक्षात घेऊन, त्यात बदल करण्याचे ठरविले असल्याचे दिल्ली कारागृहाचे डीआयजी मुकेश प्रसाद यांनी सांगितले.

बीएसएफने माओवाद्यांचे पोस्टर लावले
कोरापूट (ओडिशा) - सीमा सुरक्षा दलाने आपल्या सामुदायिक मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या बोईपारीगुडा ब्लॉकमध्ये २० जहाल माओवाद्यांची छायाचित्रे असलेले पोस्टर लावले आहे. नक्षल नेत्यांबाबत माहिती देणाऱ्यांना रोख पुरस्कार देण्याचीही घोषणा यात करण्यात आली आहे.

इटानगरचे सुरक्षा तपासणी द्वार बंद
इटानगर - असामाजिक तत्त्वांद्वारे घुसखोरीची शक्यता लक्षात घेऊन अरुणाचल प्रदेशच्या राजधानीतील सर्व सुरक्षा द्वारे बंद करण्यात आली आहेत. सतत गस्त घालण्यात येत असून, प्रत्येकाची तपासणी होत असल्याची माहिती एका शासकीय पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या
बागपत - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात मोबाईल हिसकणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुंडांनी अमित नामक युवकाच्या वडिलांचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यांना अमितने विरोध केल्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

संघर्षात एक ठार, ११ जखमी
बलिया - किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादावादीचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि यादरम्यान केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर अन्य ११ जखमी झाले. रविवारी सकाळी ही घटना घडली. पोलीस अधीक्षक के.सी. गोस्वामी यांनी ही माहिती दिली.

दूध पिल्यानंतर तीन बालकांचा मृत्यू
बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात इज्जतनगर भागात तीन बालकांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक राजीव मल्होत्रा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जसवंत नामक व्यक्तीची मुले शनिवारी रात्री दूध पिऊन झोपी गेली होती. सकाळी ती मृतावस्थेत आढळली.

कैद्याचा संशयास्पद मृत्यू
फिरोजाबाद - येथील कारागृहात बंदिस्त एका कैद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहनला सकाळी घेरी आल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आठ मासेमारांना अटक
रामेश्वरम (तामिळनाडू) - श्रीलंकेच्या नौदलाने त्या देशाच्या जलसीमेत बेकायदेशीर मासेमारी करण्याच्या आरोपात तामिळनाडूतील आठ मासेमारांना रविवारी अटक केली.

Web Title: National Important-In-Home Page