National Herald Case: दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात बुधवारी नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी झाली. या दरम्यान ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी दावा केला की, काँग्रेसला असोसिएटेड जर्नल्सची(AJL) संपत्ती लाटायची होती. काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल गांधी यांनीच ही २००० कोटींची मालमत्ता लाटण्याचे षडयंत्र रचले होते. या हाय-प्रोफाइल प्रकरणाची सुनावणी सीबीआयचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर होत आहे.
एजीएल नॅशनल हेराल्ड नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करत असे. याची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरी यांनी केली होती. आज सुनावणीदरम्यान, एसव्ही राजू म्हणाले की, एजेएलच्या संचालकांनी काँग्रेसला पत्र लिहिले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की, प्रकाशन बंद झाल्यामुळे आणि नियमित उत्पन्नाच्या अभावामुळे ते कर्ज फेडू शकत नाहीत. दरम्यान, यंग इंडियनने सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे त्याचे मालक असल्याचे घोषित केले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांनी यंग इंडियनमध्ये महत्त्वाची पदे भूषवली.
राहुल-सोनिया यांनी २००० कोटी रुपयांची फसवणूक केली- ईडीएसव्ही राजू पुढे म्हणाले की, २००० कोटी रुपयांची मालमत्ता असलेली एजेएल ही कंपनी ९० कोटी रुपयांच्या कर्जासाठी विकत घेण्यात आली होती. ही फसवणूक आहे. हा खरा व्यवहार नव्हता. एजेएल काँग्रेसने नाही तर यंग इंडियनने विकत घेतले होते. ते एक षड्यंत्र होते. काँग्रेसने त्याची गॅरंटी घेतली नाही.
९० कोटी रुपयांचे कर्ज फक्त ५० लाख रुपयांना विकल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, एक गुन्हेगारी षड्यंत्र होते, ज्यामध्ये यंग इंडियनची बनावट कंपनी म्हणून निर्मिती करण्यात आली, जेणेकरून सार्वजनिक पैशाचा वापर वैयक्तिक वापरासाठी करता येईल, असा युक्तीवाद त्यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसचे म्हणणे आहे की, यंग इंडियन ही एक नफा न मिळवणारी कंपनी असून, कोणताही वैयक्तिक फायदा घेण्यात आला नाही. आता ८ जुलैपर्यंत या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून, दोन्ही पक्षाकडून त्यांचे युक्तिवाद ऐकले जातील.
काय आहे प्रकरण?नॅशनल हेरॉल्डची स्थापना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ मध्ये केली होती. ते काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. २००८ मध्ये कर्जामुळे याचे काम बंद झाले. २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाने यंग इंडियन लिमिटेड कंपनीद्वारे एजेएलची मालमत्ता फसवणूकीने मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली.